शासनाच्या निर्णयानुसार नव्याने प्लॅन, पदाधिकारी, अधिकाऱयासह 450 कर्मचाऱयांसाठी बैठक व्यवस्था
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेसाठी सुसज्ज ‘ग्रीन बिल्डिंग’चा प्लान तयार करण्यात आला असून लवकरच नवी तीन मजली इमारत उभी राहणार आहे. राज्यातील सर्व ‘ब’ वर्ग नगर पालिका इमारतींचे स्ट्रक्चर एकसारखे असा या राज्य सरकारच्या निर्णयानुसारी ही नवी इमारत उभी राहणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सध्याची इमारत स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये धोकादायक ठरवण्यात आली होती. त्यामुळे अत्याधुनिक सहा मजली इमारतीचा सुमारे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र एकसमानतेच्या सुत्रामुळे ही इमारत आता तीन मजली ग्रीन बिल्डींग होणार असल्याचे स्पष्ट झालेआहे.
नुकत्याच झालेल्या नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीन मजली इमारतीचे नगरसेवक आणि अधिकाऱयांसमोर सादरीकरण करण्यात आले. या इमारतीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तळमजल्यावर नगराध्यक्ष आणि पदाधिकारी, पहिल्या मजल्यावर ब आणि क वर्गातील कर्मचारी तर शेवटच्या मजल्यावर सभागृह आणि कान्फरन्स हॉल अशी 450 कर्मचाऱयांची बैठक व्यवस्था आहे. आयटी ऑफिसच्या धर्तीवर सुसज्ज इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
भविष्यातील वाढीव कर्मचाऱयांचा विचार करून नवी इमारत उभारण्यात येणार आहे. नगर परिषदेत कामानिमित्त येणाऱया नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, व्हीआयपींसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. तसेच विडिओ काँफेरन्स हॉल, दोन लिफ्ट आणि साडेचारशे कर्मचाऱयांसाठी आसन व्यवस्था या इमारतीत केली जाणार आहे. इमारतीत कमीत कमी विजेचा वापर व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. इमारतीच्या दर्शनी भागात ग्रीन झोन तयार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.