प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरात ३० एप्रिलपर्यंत भाजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय भाजी विक्रेत्यांकडून घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होणार आहेत. रविवारी भाजी विक्रेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना रूग्ण वाढत असल्यामुळे भाजी व्यापाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. अशी माहिती रामभाऊ मेहता व चंदरशेठ जगदाळे यांनी दिली.
तसेच दापोलीमध्ये येणारा भाजीपाला हा वाई, महाबळेश्वर व वाशी येथून आणावा लागतो. मात्र सध्या जिल्ह्याच्या बाहेर जाण्याकरिता आरटीपीसी टेस्ट केलेली असणे गरजेचे आहे. दरवेळी ही टेस्ट करणे भाजी विक्रेत्यांना शक्य नाही. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गाड्यांना इंधन देणे पेट्रोलपंप मालकांनी शासनाच्या आदेशानुसार बंद केलेले आहे. यामुळे या भाजीच्या गाड्यांना इंधन मिळणे दुरापास्त झालेले आहे. शिवाय दापोली बाजारपेठेत चार व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून 30 एप्रिल पर्यंत भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय भाजी विक्रेत्यांनी घेतलेला आहे.