प्रतिनिधी / दापोली
अवैध वाहतूक करणाऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाव विचारण्याच्या रागातून मोटर वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे यांच्या समोर एका अज्ञाताकडून एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री दापोली बस स्थानक घडला. या विरुद्ध दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे वाहतूक निरीक्षक व वायुवेग पथकातील अधिकारी प्रदीप बनसोडे हे रात्री दापोलीत येऊन खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत होते. त्यांनी या गाड्या दापोली बस स्थानकात आणून उभ्या केल्यामुळे येथे गर्दी वाढल्याने एकच गोंधळ उडाला. या प्रदीप बनसोडे यांनी एसटीचे चालक व वाहक विकास म्हस्के व अमोल मानवतकर यांना या गाडीतून प्रवास करणाऱ्यांचे पत्ते, नाव व मोबाईल नंबर लिहून घेण्यास सांगितले. यामुळे वाद वाढला या वादात अज्ञाताकडून बसचालक व वाहक यांना धक्काबुक्की झाली. या गोंधळात काही प्रवासी एसटीने काही प्रवासी खाजगी गाडीने मुंबईकडे रवाना झाले. यानंतर बनसोडे यांनी दापोली पोलीस स्थानकात आपल्याला व दोन एसटी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकारी रमेश तडवी याचा अधिक तपास करत आहेत.









