दरडी कोसळल्या, रस्ते खचले: पूल वाहून गेल्याने सारे मार्ग बंद, महावितरणची यंत्रणा पोहोचू शकत नसल्याने गावे अंधारात
राजेंद्र शिंदे / चिपळूण
शहर परिसरात 22 जुलैला महापुराने हाहाकार उडवलेला असतानाच तालुक्याच्या पूर्व विभागातील दसपटीत अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. या विभागातील मुख्य रस्ते, पूल वाहून गेल्याने तसेच गावागावांतून दरडी कोसळल्याने दळणवळण अडचणीत आले आहे. गेल्या 13 दिवसांपासून रस्त्यांअभावी महावितरणही तेथे पोहोचू शकत नसल्याने बहुतांशी गावे अंधारात चाचपडत आहेत.

अतिवृष्टीमुळे दसपटी विभागातील तिवरे, तिवडी, रिक्टोली, कादवड, आकले, नांदिवसे वालोटी आदी गावांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. कळकवणे-आकले, नांदिवसे, तिवडी भटवाडी या प्रमुख मार्गावरील तीन पुलाचा काही भाग वाहून गेला. कादवड-कोंडावळे ते तिवडी हा गेल्यावर्षी मुख्यमंत्री ग्रामसडकमधून झालेला रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला. या मार्गावरही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली. याच गावातील तिवडी-भटवाडी हा पूल वाहून गेल्याने वाडीतील लोकांचे हाल झाले आहेत. पुलाच्या कोसळलेल्या भागाला लाकडी शिडी लावून त्याच्याआधारे पुरुष मंडळी कामधंद्याला बाहेर पडत आहेत. कळकवणे-आकले या प्रमुख मार्गावरील पुलाचा दादरकडील मोठा भाग वाहून गेल्याने या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली आहे.
या भागातील लोकांना पर्यायी मार्ग म्हणून केवळ आकले-वालोटी या लांब पल्ल्याचा रस्ता वापरावा लागत आहे. नांदिवसे मार्गावरील पुलाचा भाग कोसळल्याने या गावातील लोकांना गणेशपूर-ओवळीमार्गे बाहेर पडावे लागत आहे. वालोटी रस्त्यावर मोठÎा प्रमाणात दरडी कोसळल्याने सुरुवातीला हा मार्गही ठप्प झाला होता. मात्र येथील दरडी, माती काढून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मात्र तिवरे, रिक्टोली, तिवडी, कादवड या गावच्या लोकांना हा मार्ग लांब पल्ल्याचा होत असल्याने वेळ आणि इंधन दुप्पट लागत आहे.
गाणेखडपोली, खेर्डी या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांत या भागातील कामगार मोठ्या संख्येने कामाला येतात. मात्र सध्या त्यांना खूप मोठा वळसा मारून कामावर यावे लागते आहे. त्यातच हा मार्ग जंगल भागातून असल्याने धोक्याचा आहे. एकूणच या भागातील लोकांचे हाल होत आहेत. कळकवणे-आकले या मार्गावरील पुलाच्या वाहून गेलेल्या भागाच्या ठिकाणी भराव करून त्यावरून रिक्षा, दुचाकी वाहने सुरू झाल्यास कामगारवर्गाची कुचंबणा थांबवता येईल. काही कामगारांनी या पुलाजवळ डागडुजी करण्याचा प्रयत्नही केला.
सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या भागातील पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याशी चर्चा केली. कळकवणे-आकले मार्गावरील पुलाचे काम मंजूर असल्याने त्याच्यावर दुरुस्तीसाठी निधी खर्च करता येत नाही, ही गोष्ट खरी असली तरीही तात्पुरती डागडुजी करून लोकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्यानंतर याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. ओवळी-गणेशपूर या रस्त्याचीही राकेश शिंदे यांनी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह पाहणी केली.
रस्ता नसल्याने तिवडीत अंधार
तिवडी गावात राळेवाडी, मोरेवाडी या भागातील विजेचे खांब अतिवृष्टीमध्ये कोसळले. हे खांब रस्ता नसल्याने महावितरणला तिथे नेता येत नाहीत. त्यामुळे तिवडीमध्ये अंधार आहे. यासंदर्भात प्रधानमंत्री ग्रामसडकचे उपअभियंता अंबाजी माने, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पालशेतकर यांच्याशी पंचायत समिती सदस्य शिंदे यांनी संपर्क साधला असून लवकर तिवडी येथील रस्ता, वीज पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दसपटी लवकरच पूर्वपदावर येईल
अतिवृष्टीत कधी नव्हे ती दसपटीतील अनेक गावांची हानी झाली आहे. पूल, रस्ते अक्षरश: पाण्याच्या लोंढÎाने वाहून गेले. त्यामुळे लोकांचा सपर्क तुटला आहे. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महवितरण प्रयत्न करीत आहे. मात्र रस्ते, पूल शिल्लक नसल्याचे अडचणी येत आहेत. दरडींचे मोठे संकट दसपटीवर कोसळले आहे. शासकीय सर्व विभाग तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
– राकेश शिंदे,
सदस्य पंचायत समिती, चिपळूण
शहरात जाणे अशक्य
महापुराने माझ्या कादवड येथील क्लिनिकचे नुकसान झाले. पण दोन दिवस-रात्र मेहनत करून क्लिनिक पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज केले आहे. आज संकटात सापडलेल्या लोकांना उपचारासाठी शहरात जाणे अशक्य आहे. अशावेळी त्यांना वैद्यकीय सेवा देणे, ही आमची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.
डॉ. निशिकांत सावंत, कादवड, चिपळूण
कामगारवर्गाला मोठा फटका
कळकवणे-आकले मार्गावरील पुलाचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे त्याचा मोठा फटका कामगारवर्गाला बसला. तिवरे, रिक्टोली, तिवडी, आकले, कादवड, दादर, स्वयंदेव आदी गावांतून गाणे खडपोली, खेर्डी एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱया शेकडो कामगारांची खूप अडचण होत आहे. वालोटी रस्त्याने कामावर जावे लागते. त्यामुळे वेळ व पेट्रोलही खूप लागते.
– सुचय शिंदे, तिवरे









