जिल्हा प्रशासनाबाबत उमेदवारांमधून नाराजी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत तलाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. राज्यातील सगळय़ा जिल्हय़ात कागदपत्र पडताळणी होवून ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र रत्नागिरी जिल्हा याला अपवाद ठरला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महिनाभर शासकीय ट्रेनिंगला गेल्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्यात आली नाही. यासंदर्भात कोणतीच कल्पना उमेदवारांना नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
उमेदवारांची लेखी परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार, कोणतीही पूर्वतपासणी/छाननी न करता घेतली गेल्यामुळे उमेदवारांची यादी ही फक्त मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रसिध्द करण्यात आली. यामुळे कागदपत्र पडताळणीसाठी गुणवत्तेनुसार 278 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. या 278 उमेदवारांची कागदपत्र तपासणी 13 ते 15 नोव्हेंबरच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात पार पडली. मात्र 2 महिने उलटून गेले तरी अद्यापही अंतिम यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील उमेदवारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 13 नोव्हेंबर 2019 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात 278 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पार पडली. त्यानंतर अपेक्षित आठवडाभरात निकाल लागायला हवे होते. मात्र 2 महिने झाले तरी अद्यापही अंतिम निकाल लागला नाही.
आठवडाभरात प्रश्न मार्गी लागेल
तलाठी जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांच्या अंतिम निर्णयाशिवाय पुढील प्रक्रिया होवू शकत नाही. जिल्हाधिकारी यांना शासकीय बैठकांसाठी मुंबईत जावे लागत आहे. तसेच त्यापूर्वी ते 1 महिना ट्रेनिंगला गेले होते. आताही जिल्हाधिकारी हे बैठकीसाठी मुंबईला गेल्यामुळे येत्या आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल.









