विकासकामे रखडवल्याचा आरोप, बांधकाम खात्याकडून ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी – खेड
सुसेरी जिल्हा परिषद गटातील बहिरवली खाडीपट्टा भागातील रस्त्याची कामे रखडवत ठेवत ठेकेदारांना बांधकाम खात्याकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. गटातील कामांसाठी निधी असतानाही विकासकामे होत नसल्याच्या निषेधार्थ जि.प.सदस्या नफिसा परकार ७ डिसेंबरपासून बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे परकार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सुसेरी जिल्हा परिषद गटामध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर आहे. रस्त्यांच्या कामांचा ठेका देखील ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदार काम करत नसल्याने रस्त्यांची कामे रखडली आहेत. रखडलेल्या कामांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रखडलेल्या कामांबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे.
पन्हाळजे बौद्धवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर झाला आहे. कामाचा ठेका घेवून देखील ठेकेदाराने अद्याप कामास सुरुवात केलेली नाही. अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम सुरू न झाल्याने बौद्धवाडीतील ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गटातील रखडलेल्या विकासकामांकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. रखडलेली विकासकामे सुरू न झाल्यास ७ डिसेंबरपासून उपोषण छेडण्याचा इशारा देखील दिला होता. या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाने पत्र देवून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आहे. या पत्रात कामे रखडण्याबाबत करण्यात आलेला खुलासा हास्यास्पद असून अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमताचा पुरावाच असल्याचा आरोप करत उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.









