मुसळधार नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ाला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े चिपळूण, खेड, राजापूर येथील काही रहिवासी भागात पाणी शिरले आह़े तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. काजळी व जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आह़े पुढील 24 तासात कोकण किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्यासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल़ा खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून एनडीआरफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आह़े एनडीआरफचे 20 जवान व श्वान पथक चिपळूण शहरात दाखल झाले आहे.
चिपळुणात मुंबई -गोवा महामार्गाला नदीचे स्वरुप
चिपळूणात सोमवारी दिवसभर शहरासह तालुकाभर कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. शहरातील डीबीजे महाविद्यालयाजवळील पर्यायी मार्गावर तीन फुटापर्यत पाणी साठल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते. कापसाळ येथेही पाणी साठल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शहरातही लोटिस्मा, आईस फॅक्टरीसह ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने मुसळधार पावसात नागरिकांची दैना उडाली.
खेडमध्ये जगबुडी, नारंगीने धोक्याची पातळी ओलांडली
सोमवारी सकाळपासूनच खेड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी व नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नगर प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला. शहरातील मटण व मच्छीमार्केट परिसरातही पुराचे पाणी घुसले आहे.
संगमेश्वरात नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
सलग दोन दिवस पडणाऱया मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. पावसाची संततदार सुरू असून तालुक्यातील संगमेश्वर, फुणगूस, कसबा, माखजन बाजारपेठ मध्ये कधीही पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
राजापुरात दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील चिंचबांध रस्त्यावर अर्जुनाच्या पुराचे पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाचल परिसरालाही पुराचा तडाखा सहन करावा लागला.
लांजात पावसामुळे माहामार्गाच्या अर्धवट कामाचा नागरिकांना फटका
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच महामार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचने, झाडे पडणे, महमार्गाला भेगा पडणे अशा घटना घडू लागल्या आहेत. सोमवारी मुसळधारपणे पाऊस पडत होता. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सुरू केलेल्या महामार्गच्या अर्धवट कामाचा त्रास वाहन चालक व नागरिकांना बसत आहे. सोमवारी पावसाचे पाणी शिरल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील दुकानांना मोठा फटका बसला. अंजणारी घाटात महामार्गाच्या बाजूने सुस्थितीत गटारे न काढल्याने व गटारामधील माती न काढल्याने पावसाचे पाणी व माती गटारात साठून महामार्गावर आली. तीव्र अंजणारी घाटात तीव्र उतार असल्याने पावसाचे पाणी दुकानात शिरले. अंजणारी बस स्टॉप व दुकाना समोरील परिसर जलमय झाला होता.
गुहागरात मुसळधार पाऊस, नुकसान नाही!
तालुक्याला सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले, परंतु तालुक्यात कोठेही नुकसान झालेले नाही. गुहागर आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्येही कोणतीच नोंद नाही. शृंगारतळी बाजारपेठेमधील राष्ट्रीय महामार्गावर भरणारे पाणीही कमी झाले असून पाण्याचा निचरा योग्यपद्धतीने करण्यात आला आहे.
दापोलीमध्ये पावसाचा लपंडाव
गेल्या दोन दिवसांपासून दापोलीमध्ये पावसाचा लपंडाव सुरू आहे. दापोलीत सोमवारी दुपारी गडगडाटासह पाऊस पडला. सध्या काही मिनिटे जोरदार पाऊस व त्यानंतर विश्रांती असे चित्र आहे.