प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या आठवडय़ात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जिल्हाभरात जोर धरला आहे. मंगळवारी सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून बुधवारीही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कायम वर्तवण्यात आला. जिल्ह्य़ात या दिवशी 23.91 सरासरी इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
गणेशोत्सवादरम्यान जिल्हाभरात पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारपासून पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. मंगळवारी पहाटेपासूनच जिल्हाभरात पावसाच्या जोरदार सरी अनेक भागात कोसळत होत्या. अगदी सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह या पावसाने जोर धरला होता. बुधवारीही या पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हाभरात मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासांत एकूण 215.20 मिमि इतक्या पर्जमानाची नोंद झाली. हे पर्जन्यमान 23.91 सरासरी इतके झाले. त्यामध्ये मंडणगड 20.40, दापोली 18.80, खेड 8.50, गुहागर 43.30, चिपळूण 15.10, संगमेश्वर 29.30, रत्नागिरी 44.00, लांजा 20.50, राजापूर 15.30 मिमि इतके पर्जन्यमान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातही मंगळवारी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचे चित्र होते. हा पाऊस शेतीसाठी समाधानकारक आहे. पण, सध्या अनेक भागात हळवी भातशेती कापणीच्या मार्गावर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे असाच पावसाचा मुक्काम लांबल्यास या शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱयांमधून वर्तवली जात आहे.
दापोलीत पावसाचा जोर वाढला
मौजे दापोली ः गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून दापोली तालुक्यात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळी दापोलीकडे निघालेल्या व इतर ठिकाणी प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच आता पाऊस जाण्याच्या मार्गावर असताना पुन्हा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा पाऊस जाणार तरी कधी, असा प्रश्न पडला आहे. जोरदार पाऊस होऊनही दापोली तहसील कार्यालयात कोणत्याही आपत्तीची नोंद करण्यात आलेली नाही.
लांजा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी
लांजा ः चार दिवसांच्या ऊन-पाऊस लपंडावानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. लांजा तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. गणेशोत्सव काळात काही दिवस ऊन तर काही दिवस पावसाच्या सरी असे वातावरण सुरु होते. लांजा तालुक्यात अनंत चतुर्थी दिवसापासून पावसाने सुरुवात केली. 2 दिवसापासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदारपणे पडायला सुरुवात केली असून मंगळवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती.
खेडला पावसाने झोडपले
खेड ः सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱया पावसाचा जोर मंगळवारी दिवसभर कायम राहिला. सकाळपासून धुवाधार कोसळणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जगबुडी व नारिंगी नद्या दुथडय़ा भरून वाहत होत्या. पावसामुळे बाजारपेठेतही काही अंशी सन्नाटाच पसरला होता. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नगर प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
चिपळुणात पावसाची रिपरिप
चिपळूण ः गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. अधूनमधून जोरदार, तर दिवसभर रिपरिप सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असून व्यापारी हैराण झाले आहेत. नगर परिषद शहरात घंटागाडय़ांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना देण्याचे काम करीत आहे.









