प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात दोन दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रविवारी जिल्हय़ात सरासरी 54.44 मिमि पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्हय़ात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडून लाखोंचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री रत्नागिरीनजीकच्या वरवडे भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घबराट पसरली. दरम्यान जिल्हय़ात आणखी दोन दिवस म्हणजेच 14 व 15 जून रोजी जिल्हा प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
रत्नागिरी शहरातील मांडवी नाका ते पेठकिल्ला भागात रस्त्यावर 1 फूट पाणी साचले. या भागातून पाणी वाहून जाणारी गटारे छोटी असल्याने हे पाणी संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात भरले. खालच्या आळीच्या मागील बाजूस म्हणजे 80 फुटी रस्त्यावर असलेल्या एमएससीबी ऑफिसच्या बाजूला भागात पाणी भरले होते. त्यामुळे या परिसरात राहणारे घाणेकर, बिर्जे, भिसे आदींच्या घराच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी भरले. मोठा पाऊस पडला की, दरवर्षी ही समस्या जाणवत आहे. रस्त्याला बाजूला असलेली गटारे कमी उंचीची आहेत. 80 फुटी रस्त्याच्या काही भागातील गटारे बंद करण्यात आली आहेत. या परिसरात काही अपार्टमेंट झाल्या असून त्याचे पाणी सोडले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून या भागात मोठय़ा प्रमाणावर पावसात पाणी भरत आहे. हे भरलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने पाणी साठत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. रत्नागिरी नगर परिषदेने हे पाणी वाहून जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रत्नागिरीतील रस्ते ‘लालेलाल’
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची तर खोदाईच्या कामामुळे धोकादायक स्थिती झाली आहे. पावसात या खोदाईची माती रस्त्यावर येवून रस्ते अक्षरशः ‘लालेलाल’ झाले आहेत. या रस्त्यांवरून अनेक वाहने भरपावसात घसरून पडून अपघात होत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज अशी स्थिती उद्भवल्याने रत्नागिरीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वरवडे ग्रामस्थांनी रात्र काढली जागून
शनिवारी दुपारपासून रत्नागिरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. नजीकच्या वरवडे परिसरातही धुवांधार पाऊस कोसळला. वरवडे-भंडारवाडी येथे शनिवारी रात्री 12 नंतर पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्याने पाणी रहिवासी भागात शिरण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री 2 वाजता पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले. अचानक आलेल्या या संकटाने ग्रामस्थ पुरते भयभीत झाले. मध्यरात्री 2 वाजता शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रात्र येथील ग्रामस्थांनी जागून काढली. रात्री 2 वाजता जनावरांसह नागरिकांना स्थलांतरित करावे लागले.
अर्जुना, कोदवली नदीला पाणीच पाणी
पावसामुळे राजापूर शहरातून वाहणाऱया अर्जुना व कोदवली नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. तसेच अनेक ओढय़ांना मोठय़ा प्रमाणावर पाणी आले. होळी येथील पुलावरून पाणी वाहू लागले होते. तर या परिसरातील शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी घुसले होते.
जिल्हय़ात गेल्या 24 तासात पडलेल्या आकडेवारीनुसार, मंडणगड 45.30, दापोली 16.40 मिमि, खेड 59.40 मिमि, गुहागर 52.30 मिमि, चिपळूण 32.30 मिमि, संगमेश्वर 57.10 मिमि, रत्नागिरी 104.60 मिमि, राजापूर 61 मिमि आणि लांजा 61.60 मिमि इतक्या पावसाची नोंद झाली..









