आमदार योगेश कदम यांची ग्वाही, मालदे गावची नळपाणी योजनाही मार्गी लावण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील घेरासुमारगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणार असून या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेवून हा मार्ग देखील सुस्थितीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यापाठोपाठच मालदे गावची नळपाणी योजनाही मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी ग्रामस्थांना दिले.
गावभेट दौऱ्यादरम्यान, अस्तान गटातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य अस्तान गटाने दिले असून गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे. घेरासुमारगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्याकडे जाण्यासाठी असंख्य शिवप्रेमी येत असतात. यासाठी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेवून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
या किल्ल्याकडे जाण्यासाठी सुस्थितीतील रस्ता निर्माण करणार असून मालदे-धनगरवाडीलाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मालदे गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नळपाणी योजना मार्गी लावण्याचेही आश्वासन देत स्थानिक तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी गटात लघुउद्योगांची उभारणी करण्यावर भर देणार असल्याचेही शेवटी सांगितले.
याच गटातील मोहाने, ऐनवली, नानावले गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. येथील तीनही ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. तीनही गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासनही दिले. याप्रसंगी जि.प.सदस्य अरूण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिरीष कदम, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, दर्शना मोरे, विश्वास कदम, रामचंद्र आईनकर, प्रकाश मोहिते, राजेंद्र शेलार, श्रीकांत शिर्के, शशिकांत मोरे, गोविंद कदम, दगडू सुतार, बबन कदम, नंदकुमार चव्हाण, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.









