प्रतिनिधी/खेड
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने भीतीपोटी चाकरमान्यांचा गाव गाठण्यासाठी आटापिटा सुरू आहे. काहीजण वाटेल ती कारणे देवून पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणांनी चक्क जिवंत काकीला मृत्यूचे नाटक करायला लावत तिच्या मृत्यूचा बनाव रचला. मात्र येथील पोलिसांच्या सतर्कतेने हा बनाव उघडकीस आणून पोलिसांनी शुक्रवारी रात्री भरणे येथे दोन तरुणांना ताब्यात घेतले. या दोघांची प्राथमिक तपासणी करून 14 दिवस संख्यात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करून प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. लोकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमांसह तालुक्याच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊन अन् कोरोनाच्या भीतीने चाकरमानी गाव गाठण्यासाठी नवनव्या शक्कल लढवत आहेत. रेल्वे ट्रँकद्वारे पायी प्रवास करण्यासह जंगलातील आडवाटेनेही चाकरमानी गावी डेरेदाखल होत आहेत. मात्र, प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनाकडून त्याची खेळी मोडीत काढण्यात येत आहे.
मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरूणांनी चक्क काकीच्या मृत्यूचा बनावच रचला. हे दोघेजण भरणे येथे आले असता काकीच्या मृत्यूचे कारण पुढे करत पोलिसांना विनवणी केली. याठिकाणी रात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना त्यांच्या हालचालीचा संशय आला. खात्री करण्यासाठी त्यांनी घरी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले.
याचदरम्यान, कुटुबियांनी ठरवल्याप्रमाणे तरुणांच्या काकीने पांढऱ्या कपड्याने अंगावर लपेटून घेत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने याबाबत गावच्या पोलीस पाटील यांच्याकडे खातरजमा केली असता मृत्यूचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी दुचाकीसह दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या देखील तातडीने घटनास्थळी पोहचून काकीच्या मृत्यूचा बनाव रचणाचा तरुणांची चांगलीच कानउघडणी केली. या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Previous Articleहृतिक रोशनची गोष्ट इयत्ता सहावीच्या पाठय़पुस्तकात
Next Article परप्रांतीय मजूरांनवर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ









