प्रतिनिधी / खेड
खेड बसस्थानक ते तीनबत्तीनाका मार्गावर अचानक एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक पूर्ववत करताच वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
येथील बसस्थानकात जाणाऱया एमएच 14/बीटी 2443 या कमांकाच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावरील रस्त्याच्या कडेला बस उभी करण्यात आली. अरूंद रस्त्यामुळे वाहने मार्गस्थ होण्यास अडथळे निर्माण झाले. या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध न झाल्याने अखेर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर वाहतुकीची कोंडी फोडली. या मार्गावर बऱयाचवेळा वाहने कुठल्याही स्थितीत उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची कुठलीच व्यवस्था नाही. त्यातच गजबजलेला मार्गदेखील अरूंदच असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता रूंदीकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.









