प्रतिनिधी / खेड
शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवारा उडालेला असतानाच त्यात खासगी मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट सेवेतील व्यत्ययाची भर पडली आहे. गेल्या आठवडाभरापासून खासगी कंपन्यांच्याही इंटरनेट सेवा कोमातच गेल्या असून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएल सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. सेवेतील सततच्या व्यत्ययांमुळे ग्राहक बीएसएनएल सेवेला अक्षरश: वैतागले आहेत. सेवेत सुरळीतपणा आणण्यासाठी बीएसएनएल कार्यालयाकडून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने ग्राहकांनीही बीएसएनएल सेवेकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. याचमुळे बीएसएनएल सेवेअभावी ग्राहकांची पावले खासगी मोबाईल कंपन्यांकडे वळत आहेत. एकीकडे बीएसएनएल सेवेतील व्यत्ययामुळे कहर केलेला असतानाच खासगी मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट सेवेचाही पुरता बोजवाराच उडाला आहे. आठवडाभरापासून इंटरनेट सेवाच गायब होत असल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांचीही इंटरनेट सेवा नावापुरतीच उरली आहे. सेवेत सुरळीतपणा आणण्यासाठी बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांची व्यवस्थापन यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने ग्राहक पुरते हैराण झाले आहेत.









