नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची तत्परता, कोरोना बळींच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारी, आतापर्यंत १८ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / खेड :
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच कोरोना बळींची संख्या देखील वेगाने वाढत आहे. या कोरोनाबाधित मृतदेहांवर नगरपरिषद हद्दीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. आतापर्यंत १८ कोरोनाबाधित मृतदेहांना नगरप्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अग्नी दिला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत स्मशानभूमीमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा भासू नये, याकरिता नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तत्परता दाखवत तीन स्मशानभूमीमध्ये लाकडांचा स्टॉक वाढवला आहे. यामुळे यंत्रणांची होणारी धावाधाव थांबली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून फैलाव रोखण्यासाठी नगरप्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. शहरात कोरोनाचा शिरकाव होवू नये, याकरिता संपूर्ण प्रभागांमध्ये सर्वेक्षणाची मोहीम हाती घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृतीलाही प्राधान्य दिले होते. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी संपूर्ण शहरात हॉमिओपॅथिक औषधांचे वाटपही केले होते. नगरपरिषदेच्या सतर्कतेमुळे सलग तीन महिने शहरात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नव्हता.
मे महिन्याच्या अखेरीस सुरुवातीला दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाची एन्ट्री झाली. त्यानंतर तीन दिवसातच ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगरप्रशासन चांगलेच हादरले. यानंतर एकामागोमाग एक कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतच गेली. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना बळींच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत राहिली. शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नकारघंटाच वाजवली.
याचमुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरप्रशासनावर येवून ठेपली. आतापर्यंत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जगबुडीजवळील स्मशानभूमीसह साळीवाडा व कुंभारवाड येथील स्मशानभूमीत १८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये शहरातील ८ जणांसह ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे. नगरपरिषदेतील मुकादम अप्पा निकम, तुळशीराम चव्हाण, सुनील जाधव, स्वप्निल जाधव, अरविंद सावंत आदी कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी निभावत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरप्रशासनाने यासाठी कर्मचाऱ्यांना पूरक प्रमाणात सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १२३६ वर पोहचली आहे. कोरोना बळींचा आकडाही ५८ वर पोहचला आहे. या कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकडांची कमतरता भासत होती. यामुळे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारादरम्यान यंत्रणेला धावाधावच करावी लागत होती. यापार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तत्परता दाखवत जळाऊ लाकडांचा स्टॉक वाढवण्यासाठी जातीने लक्ष घालत तीनही स्मशानभूमीमध्ये मुबलक जळाऊ लाकडे उपलब्ध करून दिल्याने अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेतील अडथळ्यांना पूर्णविरामच मिळाला आहे.
जळाऊ लाकडांची कमतरता भासणार नाही – वैभव खेडेकर
शहरासह ग्रामीण भागात कोरोना बळींची संख्या वाढत आहे. या कोरोना बळींवर शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे स्मशानभूमीमध्ये चार हजार टनाहून अधिक जळाऊ लाकडांचा साठा उपलब्ध असून यापुढे लाकडांची कमतरता भासू देणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.









