माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती
खेड, दापोली, मंडणगडमध्ये लघुउद्योगांचे जाळे विणणार, बेरोजगारांच्या हाताला देणार काम
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या संकटामुळे मुंबईस्थित कोकणातील अनेक तरूणांच्या नोकऱ्या व रोजगार बुडाला असून त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने त्यांनी गावची वाट धरली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून बेरोजगार तरूणांना रोजगाराची चिंता सतावत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना संकटातील दिशाहीन तरूणांना सद्ममार्गावर आणण्यासाठी खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात लघुउद्योगांचे जाळे विणणार असून याची पायाभरणीही सुरू झाल्याची माहिती माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.
कोकणातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग उभारण्याची घोषणा योगेश कदम यांनी आमदार होण्यापूर्वी केली होती. या घोषणेची प्रत्यक्षात पूर्तता ‘खेड व्हॅल्यू चेन’ प्रकल्पाद्वारे होणार असून प्रकल्यासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने २ एकर जागाही उपलब्ध करून दिली आहे. या जागेत प्रकल्पाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फळे व भाजीपाल्यासाठी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने उभारण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्याद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने विकास होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ३०० हून अधिक जणांच्या हाताला काम मिळणार असून प्रकल्पाच्या विस्तारानंतर असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील वाढत्या बेरोजगारीला रोखून दिशाहीन तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘खेड व्हॅल्यू चेन’ प्रकल्प माईलस्टोनच ठरणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना फळे व भाजीपाल्यासाठी अधिक उत्पन्न देण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे सुरुवातीला खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागरनंतर संपूर्ण कोकणात जाळे पसरवण्यात येणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने मुंबईस्थित कोकणातील तरूणांच्या नोकऱ्याच हिसकावल्या असून असंख्य तरूण बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगार तरूणांपुढे कुटुंबाचा रहाटगाडा हाकायचा कसा? असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले असून रोजगाराअभावी तरूण भरकटत चालला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. यापार्श्वभूमीवर बेरोजगारीला रोखून दिशाहीन तरूणांना सद्ममार्गावर आणण्यासाठी दापोली विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यात लघुउद्योगांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे.
तीनही तालुक्यातील प्रत्येक गटात लघुउद्योगांची उभारणी करण्यात येणार असून याद्वारे बेरोजगारांच्या हाताला काम देत आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तीनही तालुक्यातील प्रत्येक गटांमध्ये बैठका घेत लघुउद्योगांच्या उभारणीबाबत प्रयत्न केला जाणार आहे. सर्वकषदृष्ट्या विचारविनिमय केल्यानंतर बेरोजगार तरुणांना लाभार्थी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोकणातील अनेक तरूणांनी मुंबईसारख्या ठिकाणी उद्योगांची निर्मिती केली आहे. या उद्योजकांकडूनही तीनही तालुक्यातील बेरोजगार तरूणांना मार्गदर्शन मिळणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात नोकरी सुटलेल्या व रोजगार बुडालेल्या तरूणांसाठी लघुउद्योगांची करण्यात येणारी उभारणी नक्कीच वरदान ठरेल, असा विश्वासही रामदास कदम यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार योगेश कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









