मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी / रत्नागिरी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी रूग्णांची गैरसोय होवू नये या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याने येथील महिला रूग्णालयात कोरोनाचे आणखी 115 बेड ची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच विविध महाविद्यालये ही ताब्यात घेण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 599 सक्रीय रूग्ण असून यामध्ये 293 रूग्ण होम आयसोलेशन असून 300 रूग्ण जिल्ह्यातील कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त परिचारिका पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. तर डॉक्टरांची कमतरता आहे, ही वस्तुस्थिती असली तरी खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जि.प.अध्यक्ष विकांत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रूग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर योग्य संख्येत उपलब्ध आहेत. महिला रूग्णालयात 150 क्षमतेचे आहे. मात्र याच रूग्णालयातील दुसऱ्या इमारतीत अजून 115 बेड वाढविण्यात येणार आहे तसेच नगर परिषदेच्या हॉस्पीटलमध्ये 50 बेड वाढवणार असल्याची उदय सामंत यांनी दिली. यासाठी सोमवारी सकाळी सामंत यांनी कोरोना रूग्णालयाला भेट देवून जागेची पाहणी करून कर्मचारी वर्गाचीही माहिती घेतली.प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद साधला पाहिजे असेही आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. तसेच नागरिकांनीही योग्य सहकार्य करून नियमावलीची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही ते बोलले.
शासनाचे आदेशाचे काटेकारेपणे पालन केल्यास शासनाकडून दिलासा-उदय सामंत रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मंत्री उदय सामंत याची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा नवीन संकट उभे राहिल्याची भावना व्यापाऱ्यांनी मंत्री सामंत यांच्यासमोर व्यक्त केली. यावर आपल्या व्यापाऱ्यांचे म्हणणे मुख्य सचिवांसमोर आणि मंत्रिमंडळ बैठकीत मांडतो. आपण व्यापाऱ्यांनी येत्या आठ दिवसात शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा यामुळे यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढता येईल अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिले आहे. यावेळी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले.









