समुद्राला मिळणारे पाणी कोकणात वापरणार, जिल्हा नियोजन समितीचा ठराव
उद्योगांसाठीही पाणी देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोयनेचे अवजल समुद्रास जाऊन मिळते मात्र त्याचा फारसा उपयोग करून घेण्यात येत नाही. त्यासंदर्भातील चर्चा अनेकदा झाली. परंतु आता जिह्यातील शेती व औद्योगिक वसाहतींना पाणी देण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत दिल्या. प्रस्तावित रिफायनरीसाठी शिवसेना हळूहळू अनुकूल होत असताना हा प्रस्ताव म्हणजे प्रकल्पाची पूर्वतयारी नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बुधवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार, खासदार, सदस्य उपस्थित होते. कोयना प्रकल्पाचे 60 एमएलडी एवढे अवजल समुद्राला मिळते. ते कोकणलाच मिळावे, असा ठराव बैठकीत करण्यात आला. नियोजित वेळेपेक्षा कितीतरी उशीराने झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यानी ही माहिती दिली. कोयना अवजल पिण्यासाठी द्यावे, याशिवाय शेतीसाठीही त्याचा वापर व्हावा. काही भाग औद्योगिक वसाहतींना दिला जावा. सध्या वापरले जाणारे एमआयडीसीचे पाणी लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कोयना अवजल मुंबई शहराकडे वळवावे, अशी कल्पना मांडली होती. त्यावर प्राथमिक सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. सुनील तटकरे जलसंपदा मंत्री असताना कोयना अवजल मुंबईकडे वळवण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली होती. पूर्वीच्या सगळ्या योजना बाजूला ठेवून कोयनेचे अवजल कोकणलाच असे म्हणत वेगळा विचार सुरु करण्यात आला आहे.
राजापुरात रिफायनरी व्हावी, अशी स्वत:ची वैयक्तिक भूमिका तेथील आमदार राजन साळवी यांनी मुंबईत पत्रकारांसमोर व्यक्त केली होती. संघटनेशी निष्ठावान असणाऱया साळवी यांना वरिष्ठांकडून तसे संदेश प्राप्त झाल्याने ही भूमिका घेण्यात आली, असे राजकीय निरीक्षक मानत आहेत. त्यापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुखांनाही या प्रकल्पाबाबत अनुकूल भूमिका घेतली होती.
यापूर्वी रिफायनरी प्रकल्प व्यवस्थापनाने कोयना अवजल आपल्या प्रकल्पासाठी वापरण्याचे ठरवले होते. तोच मुद्दा आता पुढे घेऊन कोयना अवजलाचा उपयोग कोकणातील शेती व उद्योगांसाठी करायचा आहे, असे म्हणत पाणी रिफायनरीसाठी देण्याचा इरादा तर नाही ना, असा प्रश्न राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत. कोयना अवजल राजापुरपर्यंत येताना वाटेतील सर्व गावाच्या पाणी गरजा भागवण्याचे रिफायनरी व्यवस्थापनेनेही ठरवलेले होते. आता हे धोरण तसेच पुढे चालू राहणार काय, असाही प्रश्न यामुळे राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.