राजधानी एक्सप्रेसही २ ऑक्टोबरपासून रूळावर, कोकणवासियांना दिलासा
प्रतिनिधी / खेड
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ब्रेक लागला. कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांची थांबलेली धडधड शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस २६ सप्टेंबरपासून तर निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्सप्रेस २ ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर धावणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या यार्डातच विसावल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर परराज्यातील कामगारांना त्यांच्या प्रातांत जाण्यासाठी २५ हून अधिक श्रमिक स्पेशल चालवण्यात आल्या होत्या. यानंतर गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण मार्गावर ९२ फेऱ्या चालवण्यात आल्या. यादरम्यान, गणपती स्पेशलसह दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस धावल्या. गणेशोत्सवनंतर १० सप्टेंबरला तुतारी एक्सप्रेसला ब्रक लागला होता.
यानंतर कोकण मार्गावर एकही प्रवासी गाडी धावत नव्हती. यामुळे कोकणातील जनतेची गैरसोय होत होती. आमदार योगेश कदम यांनी याप्रश्नी लक्ष घालत कोकण मार्गावर तुतारी एक्सप्रेस सुरू ठेवण्याच्या केलेल्या आग्रही मागणीला अखेर यश आले आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जाण्यासाठी व मुंबईहून गावी येण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्सप्रेस धावणार असल्याने कोकणातील जनतेची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
त्यानुसार तुतारी एक्सप्रेस दादर येथून रात्री १२.०५ वाजता सुटून सकाळी १२.२० वाजता सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडीतून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता दादरला पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, विठ्ठलवाडी, कणकवली, कुडाळ, आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहे.
कोकण मार्गावर राजधानी एक्सप्रेस देखील २ ऑक्टोबरपासून धावणार असल्याने प्रवाशांची चिंता दूर झाली आहे. ही एक्सप्रेस शुक्रवारी / शनिवारी निजामुद्दीन येथून सकाळी ११.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.२० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून रविवारी / सोमवारी सकाळी ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता निजामुद्दीनला पोहचेल. २० डब्यांच्या राजधानी एक्सप्रेसला कोठा, वडोदरा, सुरत, पनवेल, रत्नागिरी आदी स्थानकावर थांबे देण्यात आली आहे.









