रेल्वे प्रशासनाची नवीन सुविधा, आयआरसीटीसी संकेतस्थळात तांत्रिक बदलाचे काम सुरू
प्रतिनिधी/खेड
रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना अचानक बेत रद्द होवून आपल्याच कुटुंबातील अन्य व्यक्तींना प्रवास करावयाचा असल्यास ऑनलाईन कन्फर्म तिकिटावरील नावात बदल करून कुटुंबियांनाही प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने ही नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आयआरसीटीसी संकेतस्थळात तांत्रिक बदल करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. एका वेळी एकाच तिकिटासाठी ही सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तीचीच संपूर्ण माहिती घेवून प्रवास करण्यास अनुमती दिली जाते. तिकीट कन्फर्म झाल्यानंतर संबंधित व्यक्तीलाच प्रवास करणे बंधनकारक ठरते. मात्र, बऱ्याचवेळा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा बेत रद्द होतो. त्याऐवजी त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य प्रवास करू शकत नव्हते. यापुढे ती व्यक्ती प्रवास करू शकत नसल्यास कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहिण किंवा पत्नीस प्रवास करावयाचा असल्यास ऑनलाईन कन्फर्म तिकिटावरील नावात आता बदल करून प्रवास करणे शक्य होणार आहे.
आयआरसीटीसीने याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गाडी सुटण्याच्या २४ तास आधी रेल्वे आरक्षण केंद्रावर ऑनलाईन तिकिट व संबंधित कागदपत्रे घेवून जाणे बंधनकारक राहणार आहे. तिकिटावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाईन तिकिटाची व दोघाही संबंधितांच्या ओळखपत्रांची झेरॉक्स काढून नजिकच्या रेल्वे तिकिट आरक्षण केंद्रावर गेल्यानंतर एक अर्ज घेवून त्यावर जे प्रवास करणार असतील त्यांचे नाव, पत्ता लिहावे.
सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून संबंधित कर्मचाऱ्यांकडे द्यावे. यानंतर कन्फर्म तिकिटावर आई, वडील, सख्खे भाऊ, बहिण, पती, पत्नी यांच्या नावात बदल होवू शकतो. एकावेळी एकाच तिकिटासाठी ही सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना चांगला फायदा होणार आहे.
Previous Articleआजचे भविष्य शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2020
Next Article सौदीच्या नोटेवर भारताचा चुकीचा नकाशा









