प्रतिनिधी / दापोली
अरबी समुद्रामध्ये बेकायदेशीररित्या होणाऱ्या एलईडी फिशिंग, फास्टर बोटी व पर्ससीन नौकांच्याद्वारे होणाऱ्या फिशिंगच्या विरोधात अनेक निवेदने देऊन देखील काही फरक पडत नाही. यामुळे कंटाळलेल्या कोळी बांधवांनी आता बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज सोमवार 22 मार्चपासून दापोली तहसील कार्यालयासमोर सर्व कोळी बांधव तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत.
दिवसेंदिवस हायस्पीड बोटी व एलईडी बोटींची संख्या वाढत आहे. त्याची झळ पारंपारीक मच्छिमारांना बसली असून सध्या कोकण किनारपट्टीवर ८०-९० टक्के नौका बंदरामध्ये व खाडयांमध्ये नांगरुन ठेवल्या आहेत. त्यामुळे पारंपारीक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छिमार संघटनांकडून व मच्छिमारी सहकारी संस्थांकडून लोकप्रतिनिधीं मार्फत अनेक वेळ शासनाकडे लेखी निवेदन, आंदोलने या मार्गाने बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करुन देखील शासनाने बेकायदेशीर मासेमारीला अभय देऊन डोळेझाक केली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी वरील पारंपारीक मच्छिमार समाजाचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी दापोली मंडणगड- गुहागर मच्छिमार संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.