प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून साकारलेली रत्नागिरी आर्मीची पहिली टीम ‘निसर्ग’ चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या मंडणगड, दापोलीच्या मदतीसाठी रवाना झाली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. दापोली येथील आंजर्ले येथील पाडले गावात श्रमदान करण्यासाठी या आर्मीचे 50 सैनिक सकाळी 7 रवाना झाले.
या टीमसोबतच पोलीस प्रशासनाची टीमदेखील रवाना झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक प्रवीण पाटील, उपअधीक्षक गणेश इंगळे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम काम करणार आहे. रत्नागिरी आर्मी पडलेली झाडे कट करण्याचे मशिन्स कटर 5, जनरेटर 5, इलेक्ट्रिक वायर बोर्ड, दोरखंड 10, हॅलोजन, कोयत्या 10, कुऱहाड 10 फावडे 20, घमेले 20, खुरापणी 20 प्रथमोपचार किट, इंडस्ट्रीयल हँगलोज 100, सॅनिटायझर 15 लिटर, हॅन्डवॉश 5, मास्क 500, जेसीबी 1, ट्रक्टर इत्यादी सामानासाहित रत्नागिरी आर्मीची टीम सज्ज आहे. सोबत तेथील आपत्तीग्रस्तांना धान्याची आणि चादर बेडशीट टॉवेल मेणबत्ती माचीसचे किट सुमारे 500 घेण्यात आली आहेत. किटचे वाटप दापोली, मंडणगड येथे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.









