रायगड हद्दीतून ट्रक आलाच कसा ?
खैर लाकूड वाहतूक प्रकरणातील अन्य दोघे अजूनही फरारीच
प्रतिनिधी / खेड
सहा दिवसांपूर्वी येथील पोलिसांनी भरणे येथे गस्तीदरम्यान जप्त केलेल्या खैर लाकूड वाहतुकीचे रायगड कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातून खैरसाठा घेवून निघालेला हा ट्रक रायगड हद्दीतून येत असताना तेथील वनाधिकारी व रात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास का आला नाही? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. खैर लाकूड वाहतूकप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोघेजण अजूनही फरारीच आहेत.
मुंबई – गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेने खैर लाकूड घेवून जाणारा ट्रक येथील पोलिसांनी पकडला होता. लाखो रूपये किंमतीच्या रसाच्यासह टक पोलिसांनी जप्त करत संदेश भिसे, अरविंद काते ( रा. मंडणगड ) या दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील अन्य दोन फरारी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी जप्त केलेला खैरसाठा मंडणगड तालुक्यातील अरविंद काते, विजय काते, विनोद काते, संदेश भिसे यांच्या मालकीचे असून हा खैर लाकूड चिपळूण येथील एका कारखान्यात नेला जात होता.
या खैर लाकूड वाहतुकीचे कनेक्शन रायगड असल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या बिरबाडी, किन्हेरे, रेवतळे, भोमजाई, निगडे, शिवथर, नेराव, कर्कोझर आदी गावांच्या परिसरातील जंगलात खैरांची कत्तल करण्यात येते. तोडलेल्या खैराची साले काढून या खैर लाकडाची तुळशी – विन्हेरे मार्गे वाहतूक करण्यात येते. ६ दिवसांपूर्वी येथील पोलिसांनी गस्तीदरम्यान खैर लाकडाची तस्करीच उघडकीस आणली.
या खैर लाकूड वाहतूकप्रकरणी अटकेतील दोघांसह अन्य दोघे फरारीही सराईत खैर लाकूड तस्कर असून यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील हद्दीतून बेकायदेशीररित्या खैर लाकडाची वाहतूक सुरू असतानाही रायगडच्या वनाधिकान्यांसह पोलिसांना हा प्रकार दिसू नये, हे आश्चर्यकारक असून खैर तस्करीची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.









