न. प. दवाखान्यातील कोविड सेंटर उद्घाटनप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास, कार्डियाक रूग्णवाहिकेचेही लोकार्पण
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या संकटात रूग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नगरपरिषद दवाखान्यात सुरू करण्यात आलेले अद्ययावत कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसह अन्य रूग्णांचे नक्कीच मनोबळ वाढवेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. हिराभाई बुटाला विचार मंचच्या सहकार्यातून सुरू झालेले कोविड सेंटर सोमवारपासून जनतेच्या सेवेसाठी खुले झाले आहे. याशिवाय कार्डियाक रूग्णवाहिका देखील उपलब्ध झाली असून तिचाही लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,कोरोनाच्या संकटात रूग्णांवर सत्वरतेने उपचार व्हावेत. याकरिता नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला यांच्या पुढाकारातून खुले झालेले कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहेत.
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक स्त्रोताचे मार्ग बंद झालेले असतानाही कोविड सेंटर चालवणे तितकेच जिकरीचे आहे. मात्र, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी धाडसी पाऊल टाकत समाजाप्रती जनसेवेची जाणीव ठेवत नावाला साजेसे वैभवशाली काम करून दाखवण्याची किमयाच केली आहे. त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास असल्यामुळेच हे सारे साध्य झाल्याचे गौरवोद्गारही काढले. गावचा सर्वांगीण विकास करण्याची मानसिकता ठेवल्यास जनतेचे पाठबळ आपसुकच मिळते. याशिवाय अनेकांच्या मदतीचे हात देखील पुढे येत असतात, असेही शेवटी सांगितले.
याचवेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी सोफिया शेख, आरोग्य सहाय्यक निलेश सकपाळ, रचिता जाधव, सोनाली कदम, रूपेश डंबे, प्रथमेश खामकर, ज्ञानेश्वर सुतार, सुजित जाधव, राजेश खेडेकर यांना कोरोना योद्धा पुरस्काराने खासदार तटकरे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी २० खाटांच्या कोविड सेंटरमध्ये २५ रूग्णांवर उपचार होणार असून तीन सत्रामध्ये वैद्यकीय व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनावरही पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल सुरू राहणार असून रुग्णांच्या जेवण व औषधांची विनाशुल्क व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला, हिराभाई बुटाला विचार मंचचे अध्यक्ष अमोल बुटाला, एच. डी.एफ. सी. बँकेच्या स्वाती शालीग्राम,बंधन बँकचे आदित्य मराठे, प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगडचे जिल्हा प्रभारी अजय बिरबटकर, शहराध्यक्ष सतिश चिकणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा तलाठी तर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आभार मानले.









