आमदार नीतेश राणे यांची पालकमंत्र्यांवर टीका
वार्ताहर / कणकवली:
सिंधुदुर्गचे पालक म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील जनतेला न्याय देणे हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रत्नागिरी जिह्यात आरटी पीसीआर लॅब स्थापन करण्याची मागणी शासनाकडे पत्राद्वारे करतात. मात्र, कोरोना टेस्टिंगची लॅब सिंधुदुर्गात न होण्यासाठी प्रयत्न करतात, हा जिह्याचे पालक असलेल्या मंत्र्यांनी जिह्यातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला.
राणे म्हणाले, पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथे कोविड 19 च्या टेस्टिंगची लॅब करणे गरजेचे असल्याचे पत्र शासनाच्या मुख्य सचिवांना दिले. एकीकडे पालकमंत्री म्हणून सामंत जिह्याचे काम करत असताना कोरोना टेस्टिंगची लॅब रत्नागिरीत करण्याची शिफारस करतात. सिंधुदुर्ग जिह्याच्या नियोजन समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असल्याने त्यांनी जिह्यात ही लॅब होण्यासाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती. मात्र, जिह्यातील जनतेला वाऱयावर सोडून पालकमंत्र्यांनी रत्नागिरीत आपला लक्ष केंद्रीत केला आहे.
रत्नागिरीत लॅब करण्यासाठी शिफारस!
राणे म्हणाले, पालकमंत्र्यांनी शासनाच्या सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, रत्नागिरी येथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. रत्नागिरीत रेड झोन किंवा हॉटस्पॉट, कंटेनटमेंट झोन आदी भागातून 40 हजार लोक आले आहेत व आणखी लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांमध्ये कोविडची लक्षणे असणाऱयांची तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे रत्नागिरी येथे कोविड 19 ची आरटी पीसीआर लॅब स्थापन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱयांनी सादर केलेल्या 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 च्या प्रस्तावाला निधीसह मंजुरी मिळण्याची मागणी उदय सामंत यांनी केली आहे. जर रत्नागिरीत ही मागणी पालकमंत्री करतात, तर सिंधुदुर्गच्या जनतेने काय घोडे मारलेय? कोरोनाच्या काळात जिह्यातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर राजकारण कोण करतेय, हे स्पष्ट होते.









