चार वर्षांपूर्वी जाकादेवी परिसरातही आला होता नजरेस
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लांबलचक गळधारी, काठीसारखे पाय व गुलाबी…लालसर पंख या खास गोष्टीसाठी ‘फ्लेमिंगो’ या पक्षांची आकर्षक व खूप सुंदर ओळख आहे. हे पक्षी शक्यतो सरोवर किवा तलावाच्या आसपास आढळून येतात. पण रत्नागिरी तालुक्यातील गावखडीच्या समुद्रकिनारी या ‘फ्लेमिंगो’चे दर्शन नुकतेच येथील पक्षीमित्रांना घडले आहे.
‘फ्लेमिंगो’ पक्षी दिसायला उंच, फिकट गुलाबी, पांढरा किवा लालसर पंख, लांब आणि काठीसारखे दिसणारे कठीण आणि मजबूत, साधारण गुलाबी शेड असणारे पाय, गुलाबी आणि काळ्य़ा रंगाची चोच व लांब मान अशी शारिरीक वैशिष्टय़पूर्ण असते. फ्लेमिंगोला मराठीमध्ये रोहित पक्षी असे म्हणतात. रोहित पक्षी हे पाणपक्षी असल्यामुळे हे पाणी असलेल्या ठिकाणीच राहतात. बहुतेक हे पक्षी एका ठिकाणी आपले वास्तव्य करत नाहीत. त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत होणाऱया बदलामुळे हे पक्षी वेगवेगळ्य़ा ठिकाणी स्थलांतर करताना दिसतात.

इंटिग्रेटेड टॅक्सोनॉमिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या म्हणण्यानुसार, या पक्ष्याच्या सहा प्रजाती आढळतात. त्या म्हणजे लेसर फ्लेमिंगो, चिलीयन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, अँडियन फ्लेमिंगो, जेम्स (पुना) फ्लेमिंगो आणि अमेरिकन (पॅरिबियन) फ्लेमिंगो. रोहित पक्षी हे भारतामध्ये उजनी जलाशय (पुणे) किंवा जायकवाडीमध्ये (औरंगाबाद) मोठय़ा प्रमाणात आढळतात. तसेच किनारपट्टी भागातील ठाणे येथील खाडी क्षेत्रातील दलदलीच्या भागात हे पक्षी मोठय़ा संख्येने दिसत असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. हे सर्वभक्षक म्हणजेच मांसाहारी पक्षी आहेत. हा पक्षी गिधाडाहून मोठा असला तरी ते लहान, सुक्ष्म जीव, लहान कीटक आणि अळ्य़ा, निळे-हिरवे व लाल एकपेशीय वनस्पती, मोलस्क, क्रस्टेशियन्स आणि लहान मासे हे त्यांचे भक्ष्य असते.
असा हा ‘फ्लेमिंगो’ पक्षी नुकताच रत्नागिरी तालुक्यातील खाडीभागात दलदल क्षेत्रात तेथील नागरिकांच्या दृष्टीस पडत होता. ही बाब पक्षीमित्र स्वस्तिक गावडे यांच्या कानावर घालण्यात आली. गावडे यांनी वनविभागाचे राजेंद्र पाटील यांच्यासमवेत पक्षी दिसून आलेल्या परिसरात फिरत असताना ‘फ्लेमिंगो’ त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी आपल्या कॅमेऱयातून त्या आढळलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्र टिपले आहे. ‘फ्लेमिंगो हा पक्षी फारसा रत्नागिरीसारख्या भागात दिसून येत नाही. चार वर्षापूर्वी हा पक्षी जाकादेवी परिसरात आढळून आला होता, असे पक्षी अभ्यासक सुधीर रिसबुड यांनी म्हटले आहे.









