वजन-माप खात्याकडे तक्रार दाखल, – कारवाईची अपेक्षा
रत्नागिरी / प्रतिनिधी
एका बाजूला पोलिसांनी हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु केली असताना बहुतेकशी बाजारपेठ टाळेबंदीमुळे बंद आहे या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी काही विक्रेते पुढे आले आहेत. हेल्मेटवर 525 छापील किंमत असताना 600 रूपयांना ते विकले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
रत्नागिरी शहरातील विविध तपासणी नाक्यांवर वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकांवर तपासणी आणि कारवाई सुरु केली आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना दंड करण्यात येत आहे. हा दंड मोठय़ा स्वरूपात असल्याने अनेकांनी हेल्मेटची दुकाने पाहिली परंतु टाळेबंदीमुळे ती बंद होती.
या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी काही तरूण पुढे आले. 525 रूपये छापील किंमत असताना या विक्रेत्यांनी 1 हेल्मेट 600 रुपयांना विकण्याचा धडाका लावला. आम्हाला परवडत नाही असे कारण विक्रेते देऊ लागले. याविरूध्द आवाज उठवण्याचे काम करण्यात आले.
वजन, माप खात्याकडून अपेक्षा
शनिवारी रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरात सुरु असलेली हेल्मेट विक्री छापील किंमतीपेक्षा जास्त दराने होत असल्याचे अनुभवास आले. याविरूध्द वैधमापन शास्त्र खात्याच्या अधिकाऱयांकडे तक्रार नोंदवली असून त्यांच्याकडून कारवाईची रास्त अपेक्षा आहे. ज्या ग्राहकांना अशा वाढीव किंमतीचा अनुभव येत असेल त्यांनी आपल्या तक्रारी वैधमापन शास्त्र विभागाकडे नोंदवाव्यात.









