रत्नागिरी/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरु झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. शुक्रवारी नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरी येथे येताच ढोल-ताशांचा गजर करत भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. रत्नागिरी शहरामध्ये आज सकाळी साडेदहाच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. राणे यांच्यासोबत आमदार आशीष शेलार, नीलमताई राणे आदी उपस्थित आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही यात्रा होत आहे. राणे यांना झालेली अटक, जामीन आणि दीड दिवस स्थगित केलेली यात्रा आज रत्नागिरीतून पुन्हा सुरू होत असल्यामुळे ते नेमके काय बोलणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. राणे यांच्या आगमनानंतर शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली. मारुती मंदिर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यांनतर राणे यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला.