प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत़ यावर्षी आबा बागांमध्ये चांगला मोहोर दिसून येत असतानाच पावसाने यावर पाणी फेरले आह़े रविवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यासह जिह्यात 2 तास पावसाने झोडपून काढल़े तसेच गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे आंबा पीक धोक्यात आले आह़े
खेडमध्ये अवकाळीच्या हलक्या सरी
खेडः रविवारी सकाळच्या सुमारास पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीनी साऱयांचीच तारांबळ उडाली. अर्धा तास पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे रस्ते निसरडे होऊन दुचाकीस्वारांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागली. ऐन थंडीच्या हंगामातच पडलेल्या पावसामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण कायमच होते.
संगमेश्वरात आंबा, काजू पीक धोक्यात
संगमेश्वरः तालुक्यात रविवारी पहाटेच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. संगमेश्वर तालुक्यात सलग दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊससदृश स्थिती निर्माण झाली होती. रविवारी पहाटेच्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यात अचानक जोरदार अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. तालुक्यामध्ये आंबा व काजूला मोहर आला आहे. काही ठिकाणी कैरीही लागली आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे आंबा व काजू पीक धोक्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लांजात पावसाच्या हलक्या सरी
लांजाः तालुक्यात रविवारी सकाळी 8 च्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सकाळी अचानक पाऊस पडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. रविवारी पहाटे धुके, थंडी व ढगाळ असे मिश्रित वातावरण पसरले असताना पाऊस पडला. बदलत्या वातावरणाचा फटका आंबा, काजू शेतकऱयांना बसत आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण पसरले होते.
दापोलीत अवकाळी पाऊस
मौजेदापोलीः दापोली तालुक्यात रविवारी मध्यरात्री 12.15च्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ग्रामीण भागात अंगणात असलेले गवत, लाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच अचानक पडलेल्या पावसामुळे आता कुठे मेहोर आलेल्या आंबा बागायतींबाबत बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. उन्ह व थंडीचा आलेख उंचावत असल्याने आता अवकाळी पाऊस गायब झाल्याचे दिसत होते. यामुळे शेतकऱयांनी गुरांसाठी गवत, चुली पेटवण्यासाठी सुकी लाकडे अंगणामध्ये ठेवली होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण असतानाच रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱयांनी उघडय़ावर ठेवलेली लाकडे, गुरांचे गवत झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. मात्र रविवारी दिवसभर उन्ह पडल्याचे चित्र पहायला मिळाले. या पावसामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे.









