मंत्री उदय सामंत यांची घोषणा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. यात कोकणातील लोककला जपणारी भजन, नमन, जाखडी मंडळेही आर्थिक संकटात सापडली होती. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील मंडळांना आर्थिक मदत करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 8 व 11 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमात ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 55 जाखडी मंडळे नियमित लोककला सादर करतात. त्यांना प्रत्येकी 10 हजार तर 15 मंडळांना 5 हजार रु., 95 भजन मंडळांना 10 हजार रु., 117 नमन मंडळांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या संकल्पनेतील पोलीस मित्र म्हणून काम करणाऱया 60 मुलांना 5 हजार रुपये देवून गौरवण्यात येणार आहे. आपल्या मतदार संघात हा उपक्रम आपण राबवत आहोत. जिह्यासह कोकणातील अन्य आमदारांनीही आपपल्या मतदार संघातील मंडळांना आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. जाखडी, भजन मंडळांना ढोलकी, मृदुंग आदी साधने देण्याचाही मानस असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या जिह्यात कमी होत असून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेचे काम प्रभावीपणे सुरू आहे. तंत्रनिकेतनमधील अधिव्याख्यात्यांना त्यांच्या कामाचा मोबदला लवकरात-लवकर मिळेल, असेही सामंत यांनी सांगितले.









