रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी शहरालगत असलेल्या भाट्याची खाडीत कर्ला ग्रामपंचायत हद्दीमध्ये कर्ला-जूवे खार बांधारा खाजण लाभ क्षेत्रात काही अंतरावर उद मांजरांचा कळपांचे दर्शन होऊ लागले आहे. गेली अनेक वर्षे वास्तव्य असून खाडीच्या पाण्यातून पोहत-पोहत कळपाने डुबक्या मारत येणारी उद मांजरांचे दर्शन ग्रामस्थांना सुखावणारे ठरले आहे.
भाट्ये खाडी परिसरासह कर्ला जुवे गावापर्यंत विविध जैवविविधतांचे दर्शन घडविणारा किनारा आहे. त्यामुळे येथील जैव संपदेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. भाट्ये खाडी परिसरात उदमांजराचा रहिवास आहे. कर्ला, जुवे, भाट्ये किनार्यावर राहणार्या अनेक नागरिकांना ही उदमांजरं सातत्याने आढळून येतात. किनार्यावर असलेल्या नारळ-पोफळीच्या बागांपर्यंत यांची फेरी असते. खारलॅण्ड बंधार्याच्या मागील मोकळ्या भागात त्यांचा सर्वाधिक वावर असल्याचे सांगण्यात येते.
या ठिकाणी मासेमारी करणार्या अनेक मच्छीमारांसाठी ही उदमांजरं नेहमीच दिसून येतात. याला पाणमांजरही म्हटले जाते. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच या प्राण्याचे वास्तव्य आढळून येते. ऊद मांजर सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर राहतात. त्याचे मुख्य भक्ष्य मासे आहे. परंतु ते मिळाले नाही तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात. खाड्या, नदीमुखे वगैरे ठिकाणी भक्ष्य शोधण्यासाठी ते कळपाने राहतात.
रत्नागिरीतील भाट्ये, जुवे, कर्ला किनारी दिसत असलेल्या या उदमांजरांचा वास्तव्याने त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. येथील प्राण्याचा वावर निश्चितच मन सुखावून जाणार आहे. त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.









