प्रतिनिधी/ चिपळूण
खेड तालुक्यातील तिसंगी येथील मुळ रहिवासी असलेल्या व अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सेवेत असलेल्या महिला पोलीस अधिकारी सुषमा शैलेन्द्र चव्हाण यांना दुसऱयांदा राष्ट्रपतीपदक प्राप्त झाले आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या तपासकामी व पोलीस दलातील इतर कामकाजासाठी त्यांना एकूण 475 बक्षिसे मिळाली आहेत.
कोकण व पश्चिम महाराष्ट्रात शिवशाहीर म्हणून परिचीत असलेले स्व. शि. प. चव्हाण गुरूजी यांच्या सुषमा चव्हाण या स्नुषा आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेत आतापर्यंत 33 वर्षे त्यांची सेवा पूर्ण झाली आहे. 1987 साली महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. यानंतर पुणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, गुप्तचर प्रबोधिनी येथे सेवा बजावताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. अहमदनगर येथील सेक्स रॅकेटमधील 20 आरोपीना जन्मठेपेची सजा देण्यात आली. या तपासकामी मुख्य तपास अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
तसेच महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश राज्यांतील अनेक घरफोडय़ांतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतानाच फक्त 2 महिन्यांत एका घरफोडी टोळीकडून 130 गुन्हे उघडकीस आणले. तसेच दुसऱया टोळीकडून 40 घरफोडय़ांचे गुन्हे उघडकीस आणले. चेन सनॅचिंग, जबरी चोरी व सोने पॉलीश करून फसवणूक करणाऱया टोळय़ांना जेरबंद करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. पुणे शहरात लष्कर, डेक्कन व प्रॉपर्टी सेल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उत्तम काम करून त्यांनी दरारा निर्माण केला. मे 2007 मध्ये क्लिष्ट गुन्हे तपासकामी पोलीस महासंचालकांकडून त्यांना सन्मानचिन्ह मिळाले आहे. या आधी जानेवारी 2010 व आता ऑगस्ट 2020 मध्ये पुन्हा दुसऱयांदा या मानाच्या पदकांचा सन्मान त्यांना मिळाला आहे.
जनतेसमवेत नियमित संपर्कामुळे जनतेच्या मनात पोलीस दलात विश्वास निर्माण करून तपासकामात सहकार्य मिळवण्यात हातखंडा असणाऱया सुषमा चव्हाण यांनी पोलीस दलात अत्यंत शिस्तबद्ध व मनमिळावू, कार्यकुशल अधिकारी अशी ओळख निर्माण केली आहे. फुणगूस-संगमेश्वर (जि. रत्नागिरी) हे चव्हाण यांचे माहेर असून त्यांचे वडील शंकरराव रामचंद्र सावंत-देसाई हे 1991 मध्ये डीवायएसपी म्हणून सेवानिवृत झाले आहेत. चव्हाण यांचे पती शैलेन्द्र चव्हाण हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तिसंगी (खेड) व फुणगूस (संगमेश्वर) येथील गाववासियांनी चव्हाण यांच्या पोलीस सेवेतील अतुलनीय यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.









