प्रतिनिधी/ रत्नागिरी
चालू आठवडय़ात पावसाने उघडीप दिली आहे. अवकाळीचा जोरही ओसरला आहे. त्यामुळे कोकणात थंडी परतण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. येथील किमान तापमानात घट झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून ‘हुडहुडी’ ने रत्नागिरीकर गारठू लागले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक वाढलेला आहे.
गेल्या आठवडय़ात कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात सरासरीपेक्षा अधिक, रायगड जिल्हात सरासरीइतका पाऊस पडला. चालू आठवडय़ात पावसाने उघडीप दिली असली तरी आगामी आठवडय़ात अवकाळीचे सातत्य राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 5 ते 9 डिसेंबर या आठवडाभरामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आलेला आहे.
‘जवाद’ चक्रीवादळ रविवारी इशान्येकडून ओडीशाकडे सरकणार सरकल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. अवकाळीचा जोर ओसरू लागला असल्याने कोकणात थंडी परतण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात घट झाली, तर किमान तापमानात वाढ झालेली आहे. वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हय़ात तापमानाचा पारा खाली येउढ लागला आहे. ग्रामीण भागासह, शहरी भागही गेल्या दोन दिवसांपासून थंडीने चांगलाच गारठू लागला आहे.
पुणे वेधशाळेने येत्या 9 डिसेंबरपर्यत कोकण व गोव्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. रत्नागिरीत रविवारी, सोमवारी देखील किमान तापमानाचा पारा 20.9, 18.2 अंश सेल्सियस इतका खाली उतरल्याची नोंद हवामान विभागाकडे करण्यात आली. या थंडीने रत्नागिरीकरांना सायंकाळनंतर चांगलीच ‘हुडहुडी‘ने वातावरण गारठवू लागले आहे.









