वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
बॉम्बे डाईनचे चेअरमन नुस्ली वाडिया यांनी टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा आणि इतर जणांवर 3 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीसह मानहानीचा दावा सोमवारी मागे घेतला आहे. यामुळे रतन टाटांसह अन्य जणांना यातून दिलासा मिळाला आहे. वाडिया यांनी 2016 मध्ये टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी टाटा सन्स आणि त्याचे 11 बोर्ड सदस्यांसह कार्यकारी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वाडिया यांना आपली याचिका परत घेण्याबाबत परवानगी दिली आहे.
विमानसेवेद्वारे एफएमसीजी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्यांचे मालक नुस्ली वाडिया यांनी टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सच्या बोर्डामधून हटविल्यानंतर रतन टाटाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. टाटा मोटर्स, टाट स्टील आणि टाटा केमिकल्सच्या बोर्डमध्ये वाडिया स्वतंत्र संचालक होते. 2016 मध्ये नुस्ली वाडिया यांनी रतन टाटा आणि इतर जणांवर अवमानाचे प्रकरण दाखल केले होते. वाडियांनी या प्रकरणी 3 हजार कोटी रुपयांची नुकसानीची मागणी केली होती.
टाटा सन्स आणि रतन टाटा यांच्याबरोबर काही लोकांनी त्यांचा अवमान केला आहे. त्यांनी खोटय़ा आधारावर आमची बदनामी केली, असे वाडिया यांनी सांगितले आहे. मात्र, रतन टाटा आणि टाटा सन्सच्या संचालकांनी बदनामी करण्याचा आमचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. जुलै 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वाडियांची याचिका रद्द केली होती. या निर्णयावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.