आज सायंकाळी मतदानयंत्रे केंद्रांवर पोहोचणार
प्रतिनिधी/ पणजी
उद्या सोमवार दि. 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया गोवा विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार काल शनिवारी सायंकाळी संपुष्टात आला असून आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागून राहिले आहे. तसेच सर्वांना त्याची मोठी उत्सुकता आहे. मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्ग मतदान यंत्रासह आज सायंकाळपर्यंत आपापल्या केंद्रांकडे रवाना होणार असून तेथे प्रत्यक्ष मतदानाची सज्जता ते करणार आहेत. सोमवारी सकाळी 7 वा. मतदान सुरु केले जाणार असून ते सांय. 6 पर्यंत चालणार आहे.
प्रत्यक्ष मतदानासाठी मतदारयादीत नाव असण्याबरोबरच मतदार कार्ड किंवा नेहमीप्रमाणे इतर कोणतेही ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहे. कोरोनाचे नियम पाळावे लागणार असून त्या नियमांमुळे मतदानासाठी आलेल्यांची संख्या कमी असली तरी केंद्रावर मोठय़ा रांगा लागण्याची शक्यता दिसून येत आहे.
निवडणूक कर्मचारी, अधिकारी यांना प्रत्येक तालुका स्तरावरील मध्यवर्ती ठिकाणी आज रविवारी सकाळी मतदान यंत्रे व इतर सामग्रीसाठी आयोगातर्फे पाचारण करण्यात आले असून तेथे त्यांना ते उपलब्ध होणार आहे. तेथून ते सर्वजण मतदान केंद्राकडे जाणार असून रात्री केंद्रावरच मुक्काम करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
गोव्यातील 40 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवारी 1722 मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुमारे 11.56 लाख मतदार मतदानासाठी पात्र असून प्रत्यक्ष मतदान किती होते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी 10 मार्चला होणार असून त्यासाठी सर्वांना सुमारे 25 दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान यंत्रे नेण्यासाठी कर्मचाऱयांना कंदब महामंडळाच्या बसगाडय़ांची सोय करण्यात आली आहे.
40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात
विविध राजकीय पक्षांचे मिळून एकूण 301 उमेदवार 40 जागांसाठी रिंगणात आहेत. बहुतेक सर्व मतदारसंघात बहुरंगी लढती होणार असून काही निवडक ठिकाणी मात्र दोन – तीन राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये मोठी चुरस लागणार आहे. भाजप, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आरजी, आप, शिवसेना हे राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असून अनेक अपक्ष व बंडखोर उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत आली असून एकंदरित निकाल पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
मतदानाचा कालावधी दोन तासांनी वाढला
यावेळी मतदानाचा कालावधी 2 तासांनी वाढला असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे. तत्पूर्वी पहाटे म्हणजे सकाळी 5.30 वा. मतदानाची रंगीत तालीम (मॉक पोल) निश्चित करण्यात आली आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच इतर मतदारांसाठी रॅम्प, पाणी, वीज, शौचालय अशी सर्व व्यवस्था करण्यात आली असून कडक उन्हात लोकांना उभे राहावे लागू नये म्हणून अनेक मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन ते तीन पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले असून भरारी पथके, सर्वसाधारण तसेच खर्च निरीक्षक एकंदरित मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.









