सौराष्ट्राविरुद्ध सामना अनिर्णीत राहिल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, सात सामन्यात केवळ एकाच विजयाची नोंद
वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी क्रिकेटमधील बाप अशी ओळख असलेला मुंबई संघ नॉक आऊट सामन्याआधीच गारद झाला आहे. सौराष्ट्राविरुद्ध सामना अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. यातच हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना खराब हवामानामुळे रद्द झाल्यामुळे मुंबईला सौराष्ट्राविरुद्ध निर्णयाक विजयाची गरज होती. दुसऱया डावात सौराष्ट्राला विजयासाठी 290 धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली, मात्र सौराष्ट्राच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी संयमी खेळ करत सामना अनिर्णित राखला.
प्रारंभी, सर्फराज खान आणि शाम्स मुलानीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 262 धावा केल्या. यानंतर, सौराष्ट्राने पहिल्या डावात 335 धावा करत नाममात्र 73 धावांची आघाडी घेतली. त्यांच्याकडून शेल्डॉन जॅक्सन व चिराग जैनी यांनी सुरेख खेळ साकारला. यानंतर, दुसऱया डावात मुंबईच्या फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. कर्णधार सूर्यकुमार यादवचे शतक आणि शाम्स मुलानीने 92 धावा करत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने 7 बाद 362 धावसंख्येवर डाव घोषित करत सौराष्ट्राला विजयासाठी 290 धावांचे आव्हान दिले.
दुसऱया डावात मुंबईच्या गोलंदाजांची सुरुवात चांगली केली पण सातत्य राखण्यात त्यांना अपयश आल्याने मुंबईला विजयापासून दूर रहावे लागले. एकवेळ सौराष्ट्राची 7 बाद 83 अशी बिकट स्थिती होती. पण, तळाच्या कमलेश मकवाना आणि धर्मेंद्रसिंह जडेजा या जोडीने संपूर्ण सत्र खेळून काढत मुंबईची निर्णयाक विजयाची संधी हुकवली. मकवानाने नाबाद 31 तर जडेजाने नाबाद 33 धावा फटकावल्या. मुंबईकडून स्वप्नील आतर्डे व मुलाणी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. हा सामना अनिर्णीत झाल्याने मुंबईच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 262 व 362/7 घोषित
सौराष्ट्र 335 व 74 षटकांत 7 बाद 158 (हार्विक देसाई 24, वासवदा 31, मकवाना नाबाद 31, जडेजा नाबाद 33, आतर्डे 3/45, मुलाणी 3/47).
मुंबई क्रिकेटसाठी वाईट दिवस
यंदाच्या रणजी हंगामात 41 वेळ चॅम्पियन असलेल्या मुंबईची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. या हंगामातील सात सामन्यांपैकी पेवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. 4 सामने अनिर्णीत राहिले तर 2 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, नॉक आऊट सामन्याआधीच मुंबईला गाशा गुंडाळावा लागल्याने आजचा दिवस मुंबई क्रिकेटसाठी वाईट ठरला आहे.
इतर सामन्यांचे निकाल –
- दिल्ली 293 व 333/8 घोषित वि गुजरात 335 व 128/2, सामना अनिर्णीत
- राजस्थान 241 व 201 वि प.बंगाल 123 व 320/8, बंगाल विजयी
- विदर्भ 326 वि केरळ 3/191, सामना अनिर्णीत
- कर्नाटक 426 व 1/62 वि मध्य प्रदेश 431, सामना अनिर्णीत
- हिमाचल 283 व 165/3 वि रेल्वे 545/7 घोषित, सामना अनिर्णीत
- बडोदा 174 व 259 वि तामिळनाडू 7/490 घोषित, तामिळनाडू 1 डाव व 57 धावांनी विजयी









