तक्रार करुनही मनपाचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप
प्रतिनिधी बेळगाव :
रघुनाथपेठ, अनगोळ पासून ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप मागील पंधरा दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. मात्र याकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देवून येथील पथदीप सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.
रघुनाथपेठ हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे. येथूनच उद्यमबाग, बाबले गल्ली, केएलई कॉलेज, शिवशक्ती नगर, नाथ पै नगर, बडमंजीनगर आदी भागात ये-जा करण्यासाठी सोयीचा रस्ता आहे. धर्मवीर संभाजी चौक येथील मुख्य बाजारपेठेत तसेच मुख्य मार्गावरुन टिळकवाडी, हरिमंदिर येथे जाण्यासाठीहा हा मुख्य मार्ग आहे. मात्र या मार्गावरील पथदीप बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देवून पथदीप सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
गेल्या पंधरादिवसांपासून हे पथदीप बंद आहेत. यासंबंधी वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र याकडे सोयीस्कर मनपाने दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे. या रस्त्यावर रहदारी वाढली आहे. तसेच गल्लीतील लहान मुले रस्तावरुन ये-जा करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्मयता आहे. अंधर पडत असल्याने वाट शोधणे कसरतीचे होत आहे. अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. तातडीने बंद पडलेले पथदीप बसवावेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला आहे.








