सातारा जिल्हा परिषदेत 137 कर्मचाऱयांच्या पदोन्नती
प्रतिनिधी/ सातारा
मागील काही वर्षांपासुन रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयांच्या पदोन्नतीला अखेरीस मुहुर्त लागला आहे. जिल्हा परिषदेतील 137 विविध संवर्गातील कर्मचारीयांना पदोन्नती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. जिल्हा परिषदेत यामुळे या कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग उत्तर, अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग या विभागांमध्ये ही पदोन्नती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक प्रशासन, तसेच कनिष्ठ सहाय्यक प्रशासन या पदांवर 38 कर्मचाऱयांना पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर आठ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य पर्यवेक्षक महिला, आरोग्य सहाय्यक पुरुष, तसेच आरोग्य पर्यवेक्षक पुरुष अशा विविध पदांवर तब्बल 60 कर्मचाऱयांना पदोन्नती प्राप्त झाली आहे. बांधकाम विभाग उत्तर या विभागात कनिष्ठ अभियंता, आरेखक, कनिष्ठ आरेखक अशा विविध पदांवर आठ जणांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे अर्थ विभागात वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी अशा पदांवर 11 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक पदामधून ग्रामविकास अधिकारी तसेच ग्राम विकास अधिकारी पदामधून कृषी विस्तार अधिकारी अशा पदांवर बारा जणांना पदोन्नती मिळली आहे.








