प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाकाळातही फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. एका लॅब चालकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
आझादनगर येथे राहणारे मुज्जमील खतालअहम्मद कलईगार यांची लॅबोरेटरी आहे. त्यांना प्रमिलकुमार नामक एका व्यक्तीने फोन केला व 25 जणांची रक्त तपासणी करायची आहे, असे सांगितले. मुज्जमील हे सैन्यदलात भरती होणाऱया जवानांच्या रक्ताच्या चाचण्या करत असतात. कोणी तरी फोन केला असे समजून त्यांनी रक्त तपासणीसाठी होकार दिला.
रक्त घेण्यासाठी उद्या या. मात्र आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून तुमचा गुगल पे क्रमांक द्या, असे अनोळखीने त्यांना सांगितले. त्यामुळे मुज्जमील यांनी त्याला आपला क्रमांक दिला. पैसे जमा करण्याऐवजी त्या व्यक्तीने त्यांच्याच बँक खात्यातील दहा हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मुज्जमील यांना धक्काच बसला असून अशाप्रकारे कोणीही मोबाईल गुगल-पे क्रमांक मागितला तर देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाकाळातही अशाप्रकारे घटना घडत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एक तर सर्वसामान्य जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातच अशा प्रकारे जर फसवणूक होत असेल तर ही बाब गंभीर आहे. अशा घटना घडत असतील तर आता विश्वास कोणावर ठेवायचा? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.









