रक्तपेढीतील रक्त साठ्याचा डॅशबोर्ड लावण्याची होतेय मागणी
सिद्धार्थ सालिम / शाहूपुरी :
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असे मानले जाते. कारण कोणत्याही यंत्राद्वारे किंवा कोणत्याही मशिनरीद्वारे रक्त हे तयार करता येत नाही. त्यासाठी मानवावर आधारित राहावे लागते. सातारा शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर कित्येक रक्तदान शिबिरे ही आयोजित केली जातात व साठा झालेले रक्त हे रक्तपेढ्यांमध्ये ठेवले जाते परंतु अलीकडच्या काळातील रक्तपेढी यांचा मनमानी कारभार पाहता यांना आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रक्तपेढ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे नुकत्याच जारी केलेल्या त्यानुसार गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांकडून जबर दंड वसुली करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. थ्यालेसेमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क वसूल करणे, संकेतस्थळावर दररोजचा रक्तसाठा न दर्शवणे, प्लाजमा रक्त पिशवीसाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आकारणे, अशा अनेक तक्रारी रुग्णांच्या वेळोवेळी येत असल्याने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
राज्य रक्तसंक्रमण परिषदेने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी च्या बैठकीत दंडात्मक कारवाई बाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्या आधारे या सूचनांचे स्वरूप निश्चित करण्यात आली. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद राज्य रक्तसंक्रमण परिषदेने ठरवून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा ज्यादा करणे केल्यास ज्यादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड यापैकी ज्यादा करण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे विधेयक मांडण्यात आले. यामुळे भविष्यात रुग्णांना कोंडीत धरण्यासारखे प्रकार हे नक्कीच बंद होतील. अशा रक्तपेढ्यांचा मनमानी कारभार थांबण्यास मदत होणार आहे.
दंडात्मक कारवाई होणारच…
१) थैलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजारी रुग्णांकडे ओळखपत्र असूनही प्रक्रिया शुल्क आकारल्यास शुल्काच्या तिप्पट दंड आकारण्यात येणार. तसेच प्रक्रिया शुल्क रुग्णास परत केले जाईल आणि उर्वरित राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येणार.
२) रक्तसाठा असूनही ते वितरित करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक एक हजार रुपये दंड भरावा लागणार. शुल्क रुग्णासपरत करुन अन्य रक्कम परिषदेच्या खात्यात जमा होईल. संकेतस्थळावर रक्तसाठा व संबंधित माहिती न भरल्यास दररोज एक हजार रुपये दंड आकारलाजाईल. अनिवार्य माहिती न भरल्यास दररोज ५०० रुपये दंड आकारण्यात येणार.
जादा दर आकारल्यास कारवाई करणार
जिल्ह्यातील रक्तदान शिबिर पाहता जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर रक्तसाठा आहे. तसेच अलीकडच्या काळात रक्तपेढ्यांकडून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गळचेपी केल्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यास कारणे दाखवा नोटीस तसेच जादा आकारणी केल्याबाबत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तरुण भारतशी बोलताना डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन जिल्हा रुग्णालयास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.