सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह 62 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी / सातारा
कोरोना महामारीने संपुर्ण जगाला विळखा घातला असून मानवी जीवनावर भयंकर संकट ओढावले आहे. त्यातच रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी जीवीत हानी होत आहे. गरजू रुग्णांसाठी रक्त कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कर्तव्य सोशल ग्रुपने मोठा प्रतिसाद दिला असून ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह 62 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
कर्तव्य सोशल ग्रुप आणि माऊली ब्लड बँक यांच्यावतीने आणि छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप यांच्या सहकार्याने छ. शाहू अकॅडमी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत झालेल्या शिबिरात वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह 62 जणांनी रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिगचे काटेकोर पालन करण्यात आले तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.
आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना आजच्या धावपळीच्या युगात कमी होत चालली आहे. प्रत्येकजण आपआपल्या कार्यात व्यस्त असतो. मात्र, कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्ताच्या तुटवडय़ामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त नाही म्हणून रुग्णांना प्राण गमवावा लागणे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी थोडावेळ काढून रक्तदान केले पाहिजे. आपले रक्त कोणाचातरी प्राण वाचवणारे असते त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे मत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी शिबिराच्या उदघाटनप्रसगी व्यक्त केले. तसेच अडचणीच्या काळात रक्तदान करुन प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करणाऱया रक्तदात्यांचे सौ. वेदांतिकाराजे यांनी आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप विलास कासार, विजय देशमुख, चंदन घोडके, दिलावर पत्रेवाले, जितेंद्र मोहिते, रवी पवार, राजा महाडिक, प्रकाश नाईक, महेश यादव, नरेंद्र जाधव, राहूल धनावडे तसेच मराठा साम्राज्य ग्रुपचे ओंकार देशमुख, सूर्यकांत मोहिते यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.









