बॉलिवूडमधल्या अभिनेत्री फिटनेसबाबत खूपच जागरूक असतात. प्रत्येकीलाच सुंदर आणि सडपातळ दिसायचं असतं. म्हणूनच त्या आहारावर नियंत्रण ठेवतात. योगा आणि अन्य व्यायाम करतात. रकुलप्रीत सिंहही तंदुरुस्तीसाठी बरंच काही करत असते. रकुलला योगा करायला आवडतो. योगा तिच्या आयुष्याचा भाग बनून गेला आहे. ती वारंवारङ्घ इन्स्टाग्रामफ तसंच अन्य सोशल मीडिया साईट्वर व्यायाम करतानाचे फोटो अपलोड करत असते. तिचे बहुतांश फोटो योगा करतानाचे असतात. तिने योगाबद्दलचं प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं आहे. योगामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यही उत्तम राहतं, असं ती सांगते. म्हणूनच योगा हेच रकुलच्या फिटनेसचं रहस्य आहे.
मध्यंतरी रकुलने चक्रासन करताना एक फोटो शेअर केला होता. योगा करणं म्हणजे फक्त शरीर बांधेसूद करणं नाही तर आपल्या आयुष्यालाही आकार देणं असं तिने यावेळी म्हटलं होतं. रकुलने सूर्यनमस्काराचा व्हिडिओही शेअर केला. तिने लॉकडाउनच्या काळात भरपूर व्यायाम केला. ती आठवडय़ातून दोन ते तीन वेळा 108 सूर्यनमस्कार घालायची. सूर्यनमस्कारांमुळे तुम्ही आतून आणि बाहेरून बळकट बनता तसंच शरीराचं संतुलन साधलं जातं, असं तिने म्हटलं आहे. लॉकडाउनदरम्यान तिने एरियल योगा करतानाचा फोटो शेअर केला होता. योगाचा हा कठीण प्रकारही ती करत असते. 2018 पासून तिने योगा करायला सुरूवात केली. त्यानंतर तिला बरेच लाभ मिळाले. याच कारणामुळे रकुल योगाचा नेम कधीही चुकवत नाही.









