दोन वर्षांच्या कठीण काळानंतर यंदाच्या होळीला आला रंग
वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांमध्ये होळीच्या सणांवर निर्बंध लागू करण्यात आले होते. आता मात्र कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत असल्याने सरकारकडून कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी रंगांची उधळण करण्याचा होळी सण मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान यंदा होळी सणानिमित्त रंग आणि गुलालाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याची माहिती जस्ट डायल कंझ्युमर इनसाईट्सवर मिळाली आहे.
मागच्या दोन वर्षात भारतामध्ये महामारीच्या संकटामुळे सणउत्सव साजरे करता आले नाहीत. गेल्या दोन्ही वर्षी कडक निर्बंध लादले गेले होते. मात्र यावेळी 80 टक्के लोकांचे लसीकरण झाल्याने सण उत्सवाचा उत्साह मोठय़ा प्रमाणात वाढत गेल्याचे दिसून येत आहे. देशात रंगांची मागणी ही 120 टक्क्यांनी वर्षाच्या आधारे तर हर्बल गुलालाची मागणी 124 टक्क्यांनी वधारली असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच स्थानिक दुकानांमध्ये मिठाई आणि ड्रायप्रूट गिफ्ट हॅम्पर्सची मागणी वाढली आहे.
मोठय़ा शहरांमध्ये दिल्ली अव्वल
मोठय़ा शहरामध्ये टायर वन शहरात रंगाची मागणी 50 टक्क्यांनी वाढली होती. यामध्ये दिल्ली व अहमदाबाद येथे हा आकडा 25 टक्के होता. हर्बल गुलालाचा विचार केल्यास दिल्लीमध्ये मागणी सर्वाधिक राहिली असून या पाठोपाठ अन्य शहरांचा नंबर लागला आहे.
व्यावसायिकांमध्ये उत्साह
मागील दोन वर्ष सण-उत्सव प्रतिबंधामुळे साजरे झाले नाहीत. मात्र होळीपासून पुन्हा उत्सवाचा कल तेजीसोबत सुरु झाला असल्याने रंग बनविणारे व्यावसायिक आनंदी असल्याचे जस्ट डायलचे सीएमओ प्रसून कुमार यांनी यावेळी सांगितले आहे.









