गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होत आहे. गेले नऊ दिवस जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, शिवाय भारतीय चित्रपटांचा आस्वाद शेकडो चित्र रसिकांनी घेतला. जरी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 54 वा असला तरी गोव्याच्या भूमीत येऊन त्याला वीस वर्षे झाली आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीमुळे तो या भूमीत स्थिरावला आणि चित्रमयूराची केकावली प्रतिवर्षी गोव्याच्या अंगणात ऐकू येऊ लागली. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्र महोत्सवात या महोत्सवाला आता चांगलेच महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे चित्र महोत्सव. मात्र त्याच्याबरोबर चित्रपटांच्या बाजारपेठेला सुद्धा या चित्र महोत्सवांची भुरळ पडल्याने यंदाच्या वर्षी गोव्यातील महोत्सवासाठी माधुरी, सलमानसह हिंदीतील आणि देशभरातील नामांकित अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि या व्यवसायाशी संबंधित विविध मंडळी यांची गर्दी गोव्याने अनुभवली. त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. एका बाजूला ही गर्दी व्यावसायिक कलाकारांच्या भेटीच्या आनंदात मग्न होती तर दुसऱ्या बाजूला पणजी आणि पर्वरीच्या चित्रपट गृहांमध्ये देशोदेशीचे रसिक जगभरातील चित्रपटांचा आणि त्यातील विषयांच्या वैविध्यतेचा, विचारांचा, अभिनय आणि तांत्रिक करामतींचा अनुभव घेत होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात भरतोय आणि गोव्यातील जनता त्यापासून दूर आहे असा एक सूर स्थानिकांतून या निमित्ताने ऐकायला मिळाला. मात्र याबाबतीत केला गेलेला विचार हा एकतर्फी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोवा हे खूपच पूर्वीपासून पर्यटनाच्यादृष्टीने जगाच्या नकाशावर चिन्हांकित असलेले राज्य आहे. त्यामुळे इथे भारत आणि जगभरातील पाहुण्यांचे आदरातिथ्य जसे होऊ शकते, जशी गर्दी इथे सहज सामावली जाऊ शकते तशी इतर जवळच्या ठिकाणी सोय होत नाही. हे गोव्याचे बलस्थान आहे अणि तिथली अर्थव्यवस्थापण त्यामुळे चालते. शिवाय अशा महोत्सवामुळे इथे एक नवी इंडस्ट्री हळूहळू आकार घेते. हे काम केवळ शासन पातळीवर होत नाही तर तशी इकोसिस्टीम तयार होण्यासाठी स्थानिक व्यक्ती, संस्था, संघटनाही सक्रीय व्हाव्या लागतात. त्यांचा कार्यरत गट, दबावगट तयार झाला तर राज्यकर्तेही यात रस घेऊ लागतात. अशी ही दोन बाजूने समांतर चालणारी प्रक्रिया आहे. जे अशा महोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना साथ करू लागतात. पुढच्या म्हणजे 21 व्या वर्षात हा बदल दिसेल अशी अपेक्षा आहे. मुळात चित्रपट महोत्सव म्हणजे फक्त एक जत्रा नव्हे. चित्रपटाच्या क्षेत्रातील सर्व घटकांचे ते संमेलन आहे. विचारांचे आदानप्रदान आहे. त्याचवेळी त्याच्या व्यावसायिक यशासाठी तो एक वेगळा प्रयोग आहे, चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि त्याला त्या कलाकृतीतून काय सांगायचे आहे ते जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्यांच्याशी चर्चा घडवण्याचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यावसायिकांच्यादृष्टीने वेगळे विषय घेऊन येणारे आणि काही कलात्मक आणि उत्तमोत्तम कल्पना असूनही केवळ निधी अभावी थांबून असलेले चित्रपट मिळवून ते यशस्वी करायचे आणि त्यातून व्यावसायिक लाभ उठवायचा, यासाठीचे हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून अशा प्रतिभेचा शोध घेणे खूपच मुश्कील आहे आणि प्रतिभावंताला आपल्या या कलेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पैशाची उभारणी करणाऱ्याचा शोध घेत राहणेही अडचणीचे आहे. या दोन्ही घटकांसाठी हा महोत्सव एक दुवा आहे. आज सांगतेला सर्वोत्तम चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा होणार आहे. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. हा जगातील प्रतिष्ठित चित्रपट सन्मानांपैकी एक आहे. या स्पर्धेत ‘वुमन ऑफ‘, ‘अदर विडो‘, ‘पार्टी ऑफ फूल्स‘, ‘मेजर्स
ऑफ मेन, ‘लुबो‘, ‘हॉफमन्स फेरीटेल्स‘, ‘एंडलेस बॉर्डर्स‘, ‘डाय बिफोर डेथ‘ चित्रपट, ‘बोस्नीयन पॉट‘ हा चित्रपट, ‘ब्लागा‘ज लेसन्स, ‘असोग‘ चित्रपट, ‘आंद्रागोगी‘, ‘कांतारा‘, दिग्दर्शित ‘सना‘, ‘मीरबीन‘ या चित्रपटांची नामांकने जाहीर झालेली आहेत. यावेळचे सर्व चित्रपट वेगळ्या थाटणीचे आणि नव्या विचारांचे होते. जगभरातील बदलांना त्यात स्थान होते. अभिव्यक्तीची माध्यमे अनेक असली तरी चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून केलेल्या चित्रणाचा परिणाम समाजमनावर फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळेच विचारी समाज निर्मितीसाठी फिल्म सोसायटी ही चळवळ भारतात रुजली. त्यातून भारताच्या विविध भागात विचारी प्रेक्षकांची आणि प्रयोगशीलतेला दाद देणाऱ्या संघटित समाजाची निर्मिती झाली. त्यांनी भारतातील अनेक दिग्दर्शकांना पाठबळ दिले. या पाठबळाच्या जोरावरच त्यांनी नवनवीन विषय हाताळले. बंगाली, मल्याळी, कानडी, तमिळी, मराठी, गुजराती इतकेच नव्हे तर पूर्वोत्तर भारतातील छोट्या, छोट्या राज्यांतील भाषांमधूनही उत्तमोत्तम चित्रपट निर्माण झाले. आजही होत आहेत. श्वास चित्रपटानंतर महाराष्ट्रात मराठी चित्रपटसृष्टीत एक न्यू वेव्ह आली असे म्हटले जाते. ते बऱ्याच अंशी खरेही आहे आणि मराठी चित्रपटांइतके वैविध्यपूर्ण विषयांवर भारतात कुठेही चित्रपट बनत नाहीत, हेही वास्तव आहे. नागराज मंजुळे यांच्यासारख्या प्रयोगशील दिग्दर्शकांबरोबर आपण काम करावे असे महानायक अमिताभ बच्चन यांना वाटते. ही त्यापैकीच एक खूप महत्त्वाची बाब आहे. अशा काही व्यक्तिरेखा साकारायला मिळाव्यात ज्यातून आपल्याला व्यावसायिक चित्रपटांपेक्षा अधिकचे समाधान मिळेल, अशा भूमिकेची प्रतीक्षा असल्याचे आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री सांगत आहेत. हा एक चांगला बदल भारतीय चित्रपट क्षेत्रात दिसतो आहे. फिल्म सोसायटींना पाठबळ आणि इफ्फीसारखे प्रयोग जितके होतील तेवढा समाजाचा लाभ होणार आहे. त्यातील विषय प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आणि नवनव्या प्रयोग मांडणारे होते. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ गोव्यापुरते याला महत्त्व नाही. तो संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारा महोत्सव आहे. यावर्षी यात खूप मोठे बदल दिसले. विशेष करून रसिकांना तिकीटाची रांग, चित्रपटांची निवड आणि तिकीट मिळविण्यासाठीची खटपट या त्रासातून मोबाईल अॅपमुळे मुक्ती मिळाली. पुढील वर्षी यात अजून चांगले बदल दिसतील, अशी अपेक्षा करुया.








