जपानमध्ये बदलते राजकारण : शेतकऱयाच्या पुत्राची पक्षाकडून निवड
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या राजीनाम्यानंतर शेतकरीपुत्र योशिहिडे सुगा हे देशाचे नेतृत्व करणार आहेत. सुगा यांनी सोमवारी सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या (एलडीपी) निवडणुकीत विजय मिळविला आहे. मतदानात पक्षाचे एकूण 534 खासदार सामील झाले, यात सुगा यांना 377 म्हणजेच सुमारे 70 टक्के मते प्राप्त झाली आहेत. या विजयामुळे सुगा यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आह. सुगा यांनी 8 वर्षांपर्यंत देशाचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहेत. तसेच त्यांना शिजो अबे यांचा विश्वासू सहकारी मानले जाते.
पंतप्रधानपदाच्या 3 उमेदवारांसाठी डाइट मेम्बर्स आणि देशाच्या सर्व 47 राज्यांच्या तीन खासदारांनी मतदान केले आहे. याच कारणामुळे 788 खासदारांच्या ऐवजी केवळ 534 सदस्यच मतदानात सामील झाले. आपत्कालीन स्थिती पाहता ही पद्धत अवलंबिण्यात आली आहे.
आणखीन दोन नेते होते शर्यतीत
पंतपंतप्रधानपदाच्या शर्यतीत एलडीपीचे धोरणप्रमुख फुमियो किशिदा आणि माजी संरक्षणमंत्री शिगेरु इशिबा हे ही सामील होती. दोन्ही नेत्यांनी शिंजो यांनी पद सोडल्यावर त्वरित हे पद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली होती. सर्वात अखेरीस सुगा यांचे नाव समोर आले होते. किशिदा यांना 89 आणि इशिबा यांना 68 मते मिळाली आहेत. कनिष्ठ सभागृहात एलडीपीला बहुमत असल्याने सुगा हेच पंतप्रधान होणार हे निश्चित आहे.
सुरक्षारक्षक म्हणूनही केले काम
सुगा यांना वडिलांप्रमाणे शेती करायची नव्हती, याचमुळे ते शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर घरातून पळून टोकियोत पोहोचले होते. तेथे त्यांनी अनेक पार्टटाइम नोकऱया केल्या, सर्वप्रथम त्यांनी कार्डबोर्ड कारखान्यात काम केले, काही पैसे हाती आल्यावर 1969 मध्ये होसेई विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि विद्यापीठाचे शुल्क भरण्यासाठी त्यांनी अनेक नोकऱयाही केल्या आहेत. सुगा यांना एका स्थानिक मासळीबाजारात आणि सुरक्षारक्षक म्हणूनही काम केले आहे.
विदेश दौरे खूपच कमी
स्वतःला सुधारणावादी ठरविणाऱया सुगा यांनी नोकरशाहीचे अडथळे तोडून धोरण तयार करण्याचे काम केल्याचे सांगतात. जपानमध्ये विदेशी पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न, सेलफोनचे बिल कमी करणे आणि कृषी निर्यात सुधारण्याचे शेय आपले असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे. परंतु सुगा हे विदेश दौरे खूपच कमी करतात. याचमुळे त्यांच्या राजनयिक कौशल्याविषयी लोकांना अधिक माहिती नाही.
कोरोना अन् चीनचे आव्हान
सुगा देखील आबे यांची प्राथमिकता पूर्ण करण्यासाठी काम करतील अशी अपेक्षा आहे. कोरोना आणि अर्थव्यवस्थेतील घसरणीसह त्यांच्यासमोर अन्य आव्हानेही असतील. पूर्व चीन समुद्रात चीन सातत्याने अडवणुकीची भूमिका घेत आहे. सुगा यांना टोकियो ऑलिम्पिकसंबंधीही निर्णय घ्यावा लागणार आहे. अमेरिकेतील निवडणुकीनंतर नवे प्रशासन आल्यास त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत.
‘अंकल’ असे संबोधन
मागील वर्षी जपानचे तत्कालीन राजे अकिहितो यांनी स्वतःचे पद त्यागले होते. त्यांचे ज्येष्ठ पुत्र नारुहितो यांनी राजेपद स्वीकारले होते. या नव्या युगाला रेवा नाव देण्यात आले होते, याचा अर्थ सुंदर ताळमेळ असा होतो. सुगा यांनीच या नावाची घोषणा केली होती, याचमुळे प्रेमापोटी सुगा यांना अंकल रेवा म्हटले जात आहे.
आबे यांचे विश्वासू
1996 मध्ये जपानच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आल्यावर सुगा यांची शिंजो आबे यांच्याशी जवळीक वाढली. 2012 मध्ये पंतप्रधान झाल्यावर आबे यांनी सुगा यांना मुख्य केंद्रीय सचिव नियुक्त केले होते. सुगा हे तेव्हापासून आबे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत होते. दररोज 2 पत्रकार परिषदांमुळे ते चर्चेत राहिले होते. सरकारशी संबंधित प्रत्येक अडचणीच्या प्रश्नांची जबाबदारी तेच हाताळत होते.









