मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय योग दिवस मर्यादीत स्वरुपात
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात काल सोमवारी सर्वत्र साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता मर्यादित स्वरूपात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आग्वाद किल्ल्यावरील योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले. योग म्हणजे भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी असल्याचा संदेश त्यांनी व्टिटच्या माध्यमातून दिला. अनेक संस्था संघटनांतर्फे तसेच सरकारी कार्यालयांत कोरोनाचे नियम पाळून योग दिन साजरा करण्यात आला.
योगामुळे कोरोना संकटाशी सामना करण्यास मोठी मदत झाली आहे, असे सांगून योग दिनाच्या निमित्ताने डॉ. सावंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा घटक बनवूया, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाला जोडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – योग एक भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणांपैकी गोव्यातील दोन स्थळांची या अभियानासाठी निवड करण्यात आली होती. अग्वाद किल्ला, आग्वाद रोड, कांदोळी आणि तांबडी सुर्ल येथील श्री महादेव मंदिर यांचा समावेश होता. दोन्ही ठिकाणी योगाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
दोन्ही राष्ट्रीय संरक्षित स्मारके
किल्ले आग्वाद हा सतराव्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे. हा दीपगृहासोबत सिकेरी समुद्रकिनाऱयावर अरबी समुद्राकडे पाहत उभा आहे. महादेव मंदिर, तांबडी सुर्ल हे 12 व्या शतकातील कदंब शैलीतील शैव मंदिर असून भगवान शिव यांना समर्पित आहे. हिंदू उपासना करण्यासाठी ते एक सक्रिय ठिकाण आहे. गोव्यात संरक्षित आणि उपलब्ध असलेल्या बेसाल्ट दगडातील कदंब स्थापत्यकलेचा हा एकमेव नमुना मानला जातो. ही दोन्ही स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत (एएसआय) राष्ट्रीय महत्त्व असलेली संरक्षित स्मारके आहेत, म्हणून या ठिकाणी काल योग कायक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आग्वाद येथे मुख्यमंत्र्यांचा सहभाग
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी किल्ले आग्वाद येथे योगासने केली. इंडिया टुरिझमचे रोहन श्रॉफ यांनी सहभागी झालेल्या बारा जणांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. योग सत्रानंतर सांस्कृतिक मंत्रालयाच्या पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्रद्वारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
श्री महादेव मंदिर तांबडी सुर्ल येथील योग सत्र, योगशिक्षक स्नेहल तारी यांच्या देखरेखीखाली पार पडले. ज्यात एएसआय कर्मचारी आणि तांबडी सुर्ल येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सकाळी 7 वाजता झाला. त्यानंतर संगीत नाटक अकादमीच्या कलाकारांनी 7.45 ते 8.15 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी टी-शर्ट्स, विशिष्ट संकल्पना/टॅगलाइन आणि लोगो असलेले मास्क तयार करून सर्व सहभागींना पुरवण्यात आले. कोविड -19 नियमांचे पालन करत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयडीवाय 2021 ची मुख्य संकल्पना ‘निरामय आरोग्यासाठी योग’ आहे जी सध्याच्या व्यस्त जीवनाशी निगडित आहे. मंत्रालयाने जवळपास 1000 इतर हितधारक संस्थांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या अनेक डिजिटल उपक्रमांमुळे महामारीचे निर्बंध असूनही योगाभ्यास लोकांपर्यंत पोहोचला.
म्हापसा येथे योग दिन
भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हापसा येथे योग दिन कार्यक्रमात भाग घेतला. निरोगी-तंदुस्त शरीरासाठी योग आवश्यक असून मोदींच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकारने जगाला योगाची शिकवण दिली. आज अनेक देशांनी योगाचा अवलंब केला असून तो आता जीवनाचा एक भाग झाल्याचे तानावडे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांशिवाय मर्यादीत कार्यक्रम
अनेक शाळा, कॉलेज, शिक्षण संस्थांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात करण्यात आले. विद्यार्थी वर्गाला मात्र त्यापासून दूर ठेवण्यात आले. काही शाळांनी, कॉलेजनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी करून घेतले. अनेकांनी आपापल्या घरात, कार्यालयात योग दिन साजरा केला. गेल्या वर्षी देखील कोरोनाचे संकट होते म्हणून तेव्हाही अशाच पद्धतीने मर्यादित स्वरूपात योग दिन साजरा केला होता. तीच परंपरा सलग दुसऱया वर्षी कायम राहीली. कोरोना संकटावर योग हा एक चांगला व प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असल्याचे अनेकांनी त्याचा अवलंब सुरू केला आहे.









