लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सुमारे 6 महिने आधी योगी सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसऱयांदा विस्तार झाला. रविवारी 7 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झालेल्या जितीन प्रसाद यांना मंत्रिमंडळ विस्तारात ‘कॅबिनेट’चा दर्जा देण्यात आला आहे. अन्य 6 जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. नवीन मंत्र्यांमध्ये 3 ओबीसी, दोन दलित, एक एसटी आणि एक ब्राह्मण चेहरा आहे. निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा विस्तार आहे. आता योगी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 60 झाली आहे.
नव्या मंत्र्यांच्या निवडीसाठी दुपारी 2 वाजता उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा करण्यात आली. जितिन प्रसाद (ब्राह्मण) यांच्यासह छत्रपाल गंगवार (कुर्मी), पल्टू राम (दलित), संगीता बिंद (ओबीसी), संजीव कुमार (अनुसूचित जमाती), दिनेश खटीक (एससी) आणि धर्मवीर प्रजापती (ओबीसी) यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.
दुसऱयांदा विस्तार
19 मार्च 2017 रोजी सरकार स्थापन झाल्यानंतर योगी सरकारने 22 ऑगस्ट 2019 रोजी पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. आता रविवारी आणखी सात मंत्र्यांना शपथ देत दुसऱयांदा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. सुरुवातीला मंत्रिमंडळात 56 सदस्य होते. त्यापैकी कोरोनामुळे तीन मंत्र्यांचा मृत्यू झाल्याने 7 जागा रिक्त होत्या. उत्तर प्रदेशात कॅबिनेट मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या 60 पर्यंत असू शकते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 6 स्वतंत्र प्रभारी मंत्र्यांना मंत्रिमंडळाची शपथ देण्यात आली. त्यात 3 नवीन चेहरेही होते.









