गोरखपूर शहरातून निवडणूक लढवतोय चंद्रशेखर आझाद
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्हय़ात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद जनतेकडून पैसे मागत आहेत. याकरता चंद्रशेखर यांनी रितसर स्वतःचा बँक अकौंट क्रमांक, आयएफएससी कोडसह गुगल पे आणि फोन पे क्रमांकही जारी केले आहेत. या क्रमांकांना जाहीर करून त्यांनी गोरखपूरच्या जनतेकडून निवडणूक लढविण्यासाठी मदतनिधी मागितला आहे.
गोरखपूर शहर मतदारसंघात भाजप उमेदवार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याने ते चर्चेत आले आहेत. सप आणि काँग्रेसने महिला उमेदवाराला संधी दिली आहे तर बसपने मुस्लीम उमेदवार उतरविला आहे. या सर्व मोठय़ा पक्षांच्या उमेदवारांदरम्यान आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी कमी दिवसातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चंद्रशेखर यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मागील काही दिवसांपासून लोकशाहीत निवडणूक लढणे सर्वात कठिण काम असल्याची जाणीव मला होतेय. सद्यकाळात निवडणूक अत्यंत महाग ठरली असून प्रत्येक गोष्टीसाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. मी धनाढय़ आणि कॉर्पोरेट सेक्टरकून मदत इच्छित नाही. याचमुळे मी जनतेकडून मदत मागत असल्याचे त्यांनी व्हिडिओद्वारे म्हटले आहे. अनेक लोक पैसे गुगल पेद्वारे हस्तांतरित करून त्याचा स्क्रीन शॉट पाठव्त आहेत.
मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात त्यांना पराभूत करणे अत्यंत अवघड मानले जाते. प्रत्येक पक्षाने प्रबळ उमेदवार उभा केला आहे. बसप, सप, काँग्रेस, आप आणि आझाद समाज पक्षासह अन्य पक्षांचे उमेदवार देखील योगींना लक्ष्य प्रचार करत आहेत.









