ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाशी शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या काही तास आगोदर लखनऊच्या हसनगंज भागात पोलीस चकमकीत एक गुंड ठार झाला. राहुल सिंह असे या गुंडाचे नाव आहे.
लखनऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सिंह याच्यावर अलिगंजमधील ज्वेलर्सला लुटल्याचा आरोप होता. या चोरीदरम्यान त्याने एकाची हत्या केली होती. त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाचे बक्षिस ठेवले होते. शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास लखनऊ पोलिसांनी हसनगंज परिसरात त्याला घेरलं. त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात राहुल सिंह जखमी झाला होता. त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राहुल सिंहकडे लुटलेले सोन्याचे दागिने सापडले असून, पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.









