उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या पाचव्या टप्प्यात अयोध्या मतदारसंघात मतदान होत आहे. अयोध्यामध्ये सध्या रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य मंदिराचे निर्माण कार्य होत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये हा निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. शुक्रवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट दिली. शुक्रवारी सकाळी त्यांनी प्रचंड रोड शोचे नेतृत्व केले.
अयोध्येत व्यापारी आणि ब्राह्मण समाजाच्या लोकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी योगींनी विशेष प्रयत्न चालविले आहेत. शुक्रवारी त्यांनी अयोध्या शहरातील प्रमुख व्यापाऱयांच्या भेटी घेऊन त्यांना पक्षाकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकारने अयोध्येत व्यापार मोठय़ा प्रमाणावर वाढावा यासाठी विशेष योजना आखल्या आहेत. तसेच अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण झाल्यानंतर येथे पर्यटकांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून येथे भाविक तीर्थयात्रेसाठी येथील या पर्यटकांमुळे व्यापाराची भरभराट होईल. त्यामुळे भव्य राममंदिराचे निर्माण कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येला सर्वाधिक प्राधान्य
भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात अयोध्या आणि परिसराच्या विकासाला मोठे प्राधान्य दिले आहे. अनेक योजना क्रियान्वीत केल्या आहेत. मी स्वतः गेल्या पाच वर्षांच्या काळात अयोध्येला किमान 50 वेळा भेट दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतरही मी येथे येतच राहणार आहे. अयोध्येतील सर्व विकासकामे माझ्या देखरेखीखाली होतील त्यामुळे येथील लोकांनी निश्चित रहावे. त्यांच्या हितरक्षणाची चिंता करू नये असे आश्वासन त्यांनी दिले.









