महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैनाची लागोपाठ निवृत्ती, भारतीय क्रिकेट वर्तुळाला अनपेक्षित धक्का
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व डावखुरा फलंदाज, कुशल क्षेत्ररक्षक सुरेश रैना यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी अनपेक्षित निवृत्तीचा धक्का दिला आणि भारतीय क्रिकेट जगत शब्दशः ढवळून निघाले. 2007 मधील टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक व 2013 चॅम्पियन्स चषक अशा आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकून देणारा धोनी भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असून इंग्लंडमध्ये गतवर्षी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपासून हा दिग्गज खेळाडू दूरच होता. शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीविषयी अनिश्चितता संपुष्टात आली.
39 वर्षीय धोनीने आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची इन्स्टाग्राम हँडलवरुन केलेल्या पोस्टवरुन सांगता केली. या घोषणेमुळे गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला आयसीसी विश्वचषक उपांत्य सामना त्याच्यासाठी शेवटचा ठरल्याचे देखील निश्चित झाले. भारताला त्या लढतीत 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 350 वा वनडे खेळणाऱया धोनीने तेथे 72 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. डीपमधील मार्टिन गप्टीलच्या बुलेट थ्रोवर धोनीची ती खेळी संपुष्टात आली होती.
डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी त्याने 90 सामन्यात 4876 धावांचे योगदान दिले तर वनडे क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत त्याने 10733 धावांसह पाचवे स्थान संपादन केले. आपल्या कारकिर्दीत धोनीने 538 सामने, 17266 धावा, 16 शतके, 108 अर्धशतके, 359 षटकार व 829 बळी अशी कामगिरी नोंदवली.
महेंद्रसिंग धोनी
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सरासरी
कसोटी / 90 / 4876 / 38.1
वनडे / 350 / 10773 /50.6
टी-20 / 98 / 1617 /37.6
आयपीएल / 190 / 4432 / 42.2
सुरेश रैना
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सरासरी
कसोटी / 18 / 768 / 26.5
वनडे / 226 / 5615 /35.3
टी-20 / 78 / 1605 /29.2
आयपीएल / 193 / 5368 / 33.3
भारतीय क्रिकेट प्रशासक या नात्याने मी प्रदीर्घ काळ संलग्न राहिलो. महेंद्रसिंग धोनीला कर्णधार म्हणून नियुक्त केले, त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार ठरेल, याची आम्हाला खात्री होती.
-बीसीसीआयचे माजी सर्वेसर्वा शरद पवार
धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज ठरला, त्याचप्रमाणे सर्वोत्तम कर्णधारही ठरला. त्याचे योगदान निश्चितच लक्षवेधी आहे.
-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार.
भारतीय क्रिकेटसाठी माहीने दिलेले योगदान निश्चितच संस्मरणीय राहील. धोनीसह जिंकलेला आयसीसी वनडे विश्वचषक माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण ठरला.
-भारतरत्न सचिन तेंडुलकर
धोनीने भारतीय क्रिकेटसाठी जे अतुलनीय योगदान दिले, ते प्रत्येक चाहत्याच्या ह्दयात विराजमान आहे. पण, एक व्यक्ती म्हणूनही धोनीने गाठलेली उंची निश्चितच संस्मरणीय आहे.
-विद्यमान कर्णधार विराट कोहली
धोनीच्या निवृत्तीमुळे खऱया अर्थाने एका पर्वाची सांगता झाली आहे. भारतासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतासाठी देखील धोनी विशेष लक्षवेधी खेळाडू ठरला.
-बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली
धोनीची जागा भरुन काढणे कोणाही खेळाडूसाठी आव्हानात्मक असणार आहे. धोनी संघात असताना ड्रेसिंगरुमचा भाग असणे आणि त्याची खेळातील धोरणे समजून घेणे हा मी माझा सन्मान मानतो.
-मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
धोनीसारखा खेळाडू असणे म्हणजे निव्वळ अशक्य. ना कोई है, ना कोई था, ना कोई होगा एमएस के जैसा. ओम फिनिशाय नमः
-माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग.
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रभावशाली खेळाडूत धोनीचा प्राधान्याने समावेश होतो. त्याची दूरदृष्टी व संघाची बांधणी करण्याची हातोटी लक्षवेधी होती. अर्थात, आयपीएलमध्ये तो खेळणार आहे आणि 19 सप्टेंबर रोजी नाणेफेकीसाठी त्याच्या भेटीची मला प्रतीक्षा असेल.
-मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा
प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी निवृत्त व्हावे लागते आणि तो क्षण धोनीसाठी आला आहे. त्याच्यासमवेत खेळण्याची संधी मिळाली, हा माझा खऱया अर्थाने सन्मानाचा क्षण ठरला.
-माजी गोलंदाज इरफान पठाण
भारताने 2011 वर्ल्डकप जिंकला, त्यात सचिनच्या सांगतेची आठवण होते. पण, त्या विजयामागे महेंद्रसिंग धोनी मास्टरमाईंड होता, हे विसरुन चालणार नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील खराखुरा मास्टर म्हणजे धोनी.
-माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन
धोनी ज्याप्रकारे डीआरएस घ्यायचा, त्याला तोड नव्हती. एखाद्या तंत्रज्ञानावर आणखी कोणाची इतकी हुकूमत मी अजिबात पाहिलेली नाही. भारतीय क्रिकेटला लाभलेला तो महान खेळाडू आहे.
-पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा
क्रिकेटची कहाणी धोनीशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. धोनीचे योगदान सदैव स्मरणात राहील.
-पाकिस्तानचा स्पीडस्टार शोएब अख्तर
धोनी महान खेळाडू आहे आणि एखाद्या महान खेळाडूच्या थाटातच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. चॅम्पियन्स चषक, 2011 विश्वचषक आणि चेन्नईतर्फे आयपीएल विजयाच्या पाऊलखुणा नेहमी लक्षात राहतील.
-फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन
क्रिकेट मैदानात सर्वोत्तम कर्णधारांची यादी करायची असेल तर त्यात सर्वप्रथम धोनीचा आवर्जून समावेश करावा लागेल. भारताने 2011 वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी निवड समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली, तो मी सन्मान समजतो.
-माजी निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत
दिनेश कार्तिक विचारतो, 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त होणार का?
महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ त्याची 7 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्तीच्या पडद्याआड असावी, असा विचारप्रवाह कार्यरत असून त्यात यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने पुढाकार घेतला. धोनीने 2004 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी 3 महिने आधी दिनेश कार्तिकने पदार्पण केले होते. पण, धोनीचे नंतर भारतीय क्रिकेटवर साम्राज्य राहिले आणि यामुळे कार्तिकला 26 कसोटी, 94 वनडे व 32 टी-20 सामनेच आतापर्यंत वाटय़ाला आले.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केएल राहुलला पसंती शक्य
धोनीने निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची धुरा आता कोणाकडे असेल, हा प्रश्न चर्चेत आला असून नयन मोंगिया, एमएसके प्रसाद व दीप दासगुप्ता यांच्या मतानुसार मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केएल राहुलला पसंती मिळू शकते. केएल राहुलशिवाय ऋषभ पंत देखील मुख्य शर्यतीत असणार आहे.









